यापुढेही आपणच प्रदेशाध्यक्षपदी कायम : बी. वाय. विजयेंद्र
बेंगळूर : गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटपाचा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, सध्या भाजप प्रदेशाध्यक्षांमध्ये कोणताही बदल होणार नाही. यापुढेही मीच भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहीन, असे बी. वाय. विजयेंद्र यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींची माहिती दिली. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड प्रलंबित असलेल्या उर्वरित राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करेल, अशा वृत्ताच्या या मुद्द्यावर बोलताना विजयेंद्र यांनी सध्या राज्यात भाजप प्रदेशाध्यक्षांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सांगत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या अटकळींना पूर्णविराम दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढेही मीच काम करत राहीन. पक्ष संघटनेच्या उद्देशाने मी सर्वांना भेटत आहे. कोणत्याही अडचणी आल्या तरी मी सहन करून पक्ष संघटनेच्या कामात सहभागी होईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.