For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर्ण कालावधीसाठी मीच मुख्यमंत्री!

06:24 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पूर्ण कालावधीसाठी मीच मुख्यमंत्री
Advertisement

सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला विश्वास : सर्वकाही हायकमांडच्या निर्णयावर अवलंबून

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा मान सिद्धरामय्या यांना मिळाला आहे. मंगळवारी देवराज अर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असतानाच त्यांनी उर्वरित कालावधीसाठी देखील आपणच मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Advertisement

राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला गोंधळ तात्पुरता बाजूला पडला आहे. अशा परिस्थितीत सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. मंगळवारी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूर्ण कालावधीसाठी आपणच मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सर्वकाही हायकमांडच्या निर्णयावर अवलंबून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मला हायकमांडवर पूर्ण विश्वास आहे. पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी राहण्याचा आत्मविश्वास असायलाच हवा. काही झाले तरी हायकमांडच सर्वकाही ठरवेल. हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. त्याचे आम्ही सर्वांनी पालन करू, असा पुनरुच्चार सिद्धरामय्या यांनी केला.

पूर्ण कालावधीसाठी आपणच मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी वक्तव्य केल्याने त्याला राजकीयदृष्या महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील महिन्यात प्रदेशाध्यक्ष बदल, मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अनेक आमदारांनी उघडपणे वक्तव्येही केली होती. शिवाय बेळगावमधील विधिमंडळ अधिवेशन काळात सिद्धरामय्या यांनी दोन विविध प्रसंगांमध्ये पाच वर्षांकरिता मीच मुख्यमंत्री, असे उघडपणे सांगितले होते. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने कोणीही नेतृत्त्व बदलाच्या मुद्द्यावर उघडपणे भाष्य करू नये, अशी ताकीद दिली होती. त्यामुळे हा मुद्दा सध्या बाजूला पडला आहे.

विक्रम मोडण्यासाठी राजकारण केलेले नाही!

माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांचा विक्रम मोडण्यासाठी मी राजकारण केलेले नाही. हा विक्रम केवळ योगायोग आणि जनतेचा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी दिली आहे. देवराज अर्स यांच्या राजकारणाचा काळ वेगळा होता, आजचा राजकारणाचा काळ वेगळा आहे. देवराज अर्स यांच्यासारख्या महान नेत्याशी माझी तुलना करू नका. मी जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो आहे.

 ‘आय विश हिम ऑल द बेस्ट’ : शिवकुमार

मी सिद्धरामय्या यांना शुभेच्छा देत आहे. ‘आय विश हिम ऑल द बेस्ट’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. सिद्धरामय्या यांनी पूर्ण कालावधीसाठी मीच मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण होणार नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी शिवकुमार यांना विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले. तुम्ही (प्रसारमाध्यमे) गोंधळ निर्माण करत आहात. आमच्यापैकी कोणीही गोंधळलेले नाही. मुख्यमंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. त्यांना उत्तम आरोग्य मिळावे, जनसेवेची आणखी संधी द्यावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

सिद्धरामय्या हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर राहतील. त्यांना आमदारांनी अडीच वर्षांचे मुख्यमंत्री म्हणून निवडलेले नाही. मुख्यमंत्री बदल हा प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेला विषय आहे, असे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरे•ाr यांनी म्हटले आहे. कुणाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटणार नाही? मी मुख्यमंत्री का बनू नये? मी देखील ज्येष्ठ आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर आमदारांची मते घ्यावी लागतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.