For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पराभवाची पूर्ण जबाबदारी माझी : प्रशांत किशोर

07:00 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
पराभवाची पूर्ण जबाबदारी माझी   प्रशांत किशोर
Advertisement

राजकारण सोडण्यासाठी ठेवली नवी अट : एक दिवसीय मौन व्रताची केली घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता न आलेल्या जनसुराज पक्षाचे सूत्रधार प्रशांत किशोर यांनी अखेर सर्वांसमोर येत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. आमच्याकडुन निश्चितपणे काही चुका झाल्या आहेत. जनतेने आम्हाला निवडले नाही तसेच आमच्यावर विश्वासही दाखविला नाही. या पराभवाची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. आम्ही आता बिहारमधून गरीबी दूर होत पलायन कमी होईल, अशी अपेक्षा करत आहोत. बिहारच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही यामुळे मी माफी मागतो. प्रायश्चित म्हणून भितिहरवा गांधी आश्रमात गुरुवारी एक दिवसाचे मौन व्रत राखणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी पाटण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले आहे. चूक होऊ शकते, परंतु आम्ही गुन्हा केलेला नाही. मी जातींचे विषय फैलावण्याचा गुन्हा केलेला नाही.

Advertisement

जनतेचे मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही पुन्हा उभे राहू. जोपर्यंत जिंकणार नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही. जोपर्यंत व्यवस्था सुधारत नाही तोवर मागे हटणार नाही. आता दुप्पट मेहनतीने बिहारच्या जनतेसाठी काम करू, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. निकालानंतर 10 हजार रुपयांची मोठी चर्चा होत आहे. 10 हजार रुपयांसाठी जनता स्वत:च्या मुलांचे भविष्य विकू शकत नाहीत. लोकांनी केवळ 10 हजार रुपयांसाठी स्वत:चे मत विकले नाही. निवडणूक आयोगावरही टीकाटिप्पणी करण्याची ही वेळ नाही. रालोआला मतदान केल्यास 2 लाख रुपये दिले जातील, हे सांगण्यासाठी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा वापरण्यात आली. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जीविका दीदी, अंगणवाडी, ममता, स्थलांरित मजुरांकरता सुमारे 29 हजार कोटी रुपये सरकारने वितरित केले. 40 हजार कोटी रुपयांच्या योजना सुरू करण्यात आल्याचा दावा किशोर यांनी केला.

जनतेसाठी लढाई लढू

ज्या महिलांना सरकारने 10 हजार रुपये दिले, त्यांना दोन लाख रुपये देण्याचे आवाहन मी सरकारला करतो. जर असे नाही झाले तर 10 हजा रुपयांमध्ये मते खरेदी करण्यात आल्याचे मानले जाईल. संजदला 25 हून अधिक जागा मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे मी जाहीर केले होते आणि यावर मी अद्याप ठाम आहे. नितीश कुमार यांनी 10 हजार रुपये देत मते खरेदी केली आहेत. पुढील 6 महिन्यांमध्ये रालोआ सरकारने 10 हजार रुपये ज्या महिलांना दिले, त्यांना 2 लाख रुपये दिले तर मी राजकारण सोडेन. महिलांच्या खात्यात 6 महिन्यांमध्ये दोन लाख रुपये जमा न झाल्यास आमच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून लोकांनी माहिती द्यावी. आम्ही लोकांसाठी लढण्यास तयार आहोत असे उद्गार किशोर यांनी काढले.

पक्षाच्या कुठल्याही पदावर नाही

जनसुराज पक्षात मी कुठल्याही पदावर नाही, यामुळे मी कुठल्या हक्काने संन्यास घ्यावा. मी राजकारण सोडणार, असे म्हटले होते आणि यावर मी ठाम आहे. मी राजकारण करत नाही. नितीश सरकारने दीड कोटी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिले. निवडणुकीदरम्यान आयोगाने पैसे कसे वाटू दिले यावर पूर्ण देशात चर्चा सुरू आहे. यावर मी आताच टिप्पणी करणार नाही. आम्ही पराभूत झालेलो नाही, कारण आम्ही शर्यतीतच नाही, असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे.

उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाबद्दल प्रश्न

मधुबनी क्षेत्रात उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाचे चिन्ह कुणालाच ठाऊक नाही, परंतु त्या क्षेत्रात या पक्षाच्या उमेदवाराला 1.25 लाख मते मिळाली. तर अनेक वर्षांपासून राजकारणात असलेल्या लोकांना हजारभर मते मिळाली. आम्ही तीन वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहोत, तरीही आम्हाला कमी मते मिळाली. परंतु तुलनेत नवख्या कुशवाह यांच्या पक्षाला 1 लाखाहून अधिक मते कशी मिळाली हा मोठा प्रश्न असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांचे उदाहरण

प्रशांत किशोर यांनी पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या राजकारणाच्या मॉडेलचा दाखला दिला. पाकिस्तानात इम्रान खान यांनी सुमारे 25-30 वर्षांपूर्वी स्वत:चा पक्ष सुरू केला. त्यांच्या पक्षाने 7 जागा लढविल्या होत्या आणि सर्वठिकाणी पक्षाचा पराभव झाला होता. मी निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय वेगळा विषय आहे. मागील तीन वर्षांमध्ये जनसुराजने केलेले प्रयत्न जनतेने स्वीकारले नाहीत हे मी सांगू इच्छितो. लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, सम्राट चौधरी, अशोक चौधरी यासारख्या मातब्बर नेत्यांप्रमाणे मला बिहारची समज नाही. कारण मी भ्रष्टाचार केलेला नाही. बिहारला जाती, धर्माच्या नावावर कसे विभागावे याची मला समज नाही. बिहारमध्ये 10 हजार रुपये देत कशाप्रकारे मते खरेदी करावीत, हे देखील मला ठाऊक नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.