For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती

06:18 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मज मानव रूपात  तुच्छत्वे मूढ देखती
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भगवंतांनी अर्जुनाला मी सर्वव्यापी असून सर्व प्राणीमात्र माझ्यात कायमचे सामावलेले असतात ही त्यांच्या मनातली गुप्त गोष्ट सांगितली आणि म्हणाले, ज्याप्रमाणे साखरेच्या ढीगापासून साखरेची चित्रे तयार केली तर ती त्या ढिगात होतीच फक्त त्याच साखरेचा पाक करून साच्यात ओतल्याने चित्रे तयार होतात असे म्हणता येईल किंवा त्याउलट ती चित्रे पाण्यात विरघळवून पुन्हा त्यांची साखर होऊ शकते त्याप्रमाणे हे प्राणीमात्र माझ्या इच्छेनुसार माया प्रकट करते आणि मला वाटले की, त्यांचा पुन्हा लोप होतो. ह्याची अनुभूती घेण्यासाठी बाह्य गोष्टींचे आकर्षण सोड आणि अंतर्मुख हो. माझ्या अनन्य भक्तांना हे शक्य होते. अनन्य भक्तांची गोष्ट सोडली तर इतरेजनासाठी मी त्यांच्यापैकीच एक मनुष्य असतो. त्यामुळे ते प्रसंगी मला हिणवतात, माझी चेष्टा करतात.

भगवंतांनी त्यांची खंत व्यक्त करणारा

Advertisement

मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती। नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व- चालक।। 11 ।।

सांगितलेला हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. भगवंत अर्जुनाला म्हणाले, तू कदाचित मी सांगितलेल्या माझ्या स्वरूपज्ञानाला विसरशील आणि मला तुमच्यातीलच एक मानण्याची चूक करशील. जे मला त्यांच्यातील एक मानण्याची चूक करतात त्यांना माझ्या स्वरूप ज्ञानाचा पत्ता लागत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही, त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेऊन जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे. मी स्थूल आहे, अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे मूर्ख लोक, त्यांच्या समजुतीप्रमाणे माझ्याकडे पाहतात परंतु त्यांचे तसे पाहणेच माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होण्यास प्रतिबंध करते. दिसतं तसं नसतं अशी एक म्हण आहे. त्याबद्दल अनेक उदाहरणे देता येतील. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाना ती रत्ने आहेत अशा समजुतीने ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून एखादा राजहंस आपला घात करून घेतो किंवा ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ कुणी येऊन पोहोचला तर त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय? हा नीलमण्यांचा दोन पदरी हार आहे अशा बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार व्हावे अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात किंवा द्रव्याचा ठेवाच प्रगट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत अथवा ही आपली पडछाया आहे, असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धीमध्ये माझ्याविषयी असा निश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील प्रतिबिंबाला कवटाळल्यासारखे आहे. परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला असेच म्हणावे लागेल. ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताच्या परिणामाची अपेक्षा करावी तसे नाशिवंत स्थूल आकार हेच माझे खरे स्वरूप आहे अशा निश्चयाने ते जर मला अविनाशाला पाहतात तर त्यांना मी कसा दिसेन?

क्रमश:

Advertisement
Tags :

.