....तर मी स्वतः राजाराम कारखान्यावर धडक देणार- आमदार सतेज पाटील
राजाराम सहकारी साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवसात नाही नेल्यास, आपण स्वतः राजाराम कारखान्यावर धडक देणारअसल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्याने आज ऊस उत्पादक सभासदांचा मोर्चा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. ऊस न नेण्यामागे, सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ऊस नोंदणीचे करार कारखान्यांकडून गायब केले जात आहेत. त्यामुळं ज्यांनी नोंदी घातल्या आहेत त्याची एक प्रत अजिंक्यतारा कार्यालय किंवा श्री राम सोसायटी येथे आणून द्यावी. असं आवाहनही त्यांनी केलं.
हेही पाहा>>>राजू शेट्टी आमच्यासोबत येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न- आमदार सतेज पाटील
लोकशाहीमध्ये मतदान कोणाला करायचं हा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र विरोधातील सभासदांचा ऊस न्यायचा नाही हे राजकारण सुरू आहे. मात्र आता मागे हटणार नसून कारखान्याच्या चुकीच्या कारभाराविरोधात आपली न्यायालयीन लढाई देखील सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण स्वतः आता पर्यंत कधी राजाराम कारखान्यांमध्ये गेलो नाही. मात्र जर सभासदांच्या वर अन्याय होत असेल तर आपण स्वतः राजाराम कारखान्यावर जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितल.
यावेळी साखर सहसंचालक जी जी मावळे यांना निवेदन देण्यात आल. यावेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, माजी नगरसेवक मोहन सालपे, बंडोपंत सावंत, किरण भोसले यांच्यासह ऊस उत्पादक सभासद या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.