For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद

06:34 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
माझ्या मना लागो छंद  गोविंद  नित्य गोविंद
Advertisement

प्रापंचिक माणसाला संसाराची फार आवड असल्याने त्याच्यासाठी योगमार्गाची वाटचाल बिकट असते. त्याचाही उद्धार व्हावा, त्यानेही ब्रह्मस्वरूप व्हावे ह्या उद्देशाने भगवंत म्हणाले, मी सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी आहे व माझ्या ठिकाणी प्राणिमात्र आहेत असे जो पाहतो तो योग्युक्त सर्व ठिकाणी समदृष्टीने पाहू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही कायमचे एकमेकांचे होऊन राहतो. मी एकट्यानेच सर्व विश्व व्यापलेले आहे हे ज्याच्या लक्षात येते तो जरी नामरूपाने माझ्यापेक्षा वेगळा असला तरी मत्स्वरूप झालेला असतो. तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्याने राहतो. तो शरीरधारी जरी असला तरी शरीरात अडकून पडत नाही.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, तो माझ्याप्रमाणे इतरांच्या सुखदु:खाकडे स्वत:च्या सुखदु:खाप्रमाणे पहात असल्याने तो अत्यंत श्रेष्ठ अवस्थेला पोहचलेला आहे असे समजावे.

जो अत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र सम पाहतो।जसे सुख तसे दु:ख तो योगी थोर मानिला ।।32 ।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, माझे स्वरूप झालेल्या योग्याला माझी मन:स्थिती प्राप्त झाली असल्याने सर्व चराचर आपणच व्यापले आहे असे त्याला कायम वाटत असते. त्यामुळे त्याला सर्वसामान्यांना जाणवणारा माणसामाणसातला फरक जाणवत नाही. त्याला स्वत:सह सर्व माणसे ईश्वराची रूपे आहेत असे जाणवत असल्याने त्यांची सुखदु:खे, पापपुण्ये त्याला स्वत:ची वाटू लागतात. समविषमभाव, बऱ्या, वाईट गोष्टी, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तु, हे सर्व आपलेच अवयव आहेत, असे तो समजतो. त्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत अशी अनुभूती वारंवार येत असते. गंमत म्हणजे त्यालाही देह असतो, त्यालाही आजार होतात, त्याची अशी सुखदु:खे त्याला असतात आणि त्याप्रमाणे तो ती वरकरणी दर्शवत असला तरी आतून तो परब्रह्माशी एकरूप झालेला असतो परंतु लोकांना ह्याची जाणीव नसल्याने प्रसंगानुसार तो आज सुखी आहे किंवा दु:खी आहे असे ते म्हणत असतात.

ज्याला हे शक्य झालेले असते तो स्वत:च्या देहाकडे त्रयस्थपणे पाहू शकतो. तो वरकरणी कसाही दिसत असला, कसाही वागत असला तरी तो परब्रह्मच असतो. म्हणून आपल्या ठिकाणी जगत् पहावे आणि आपण जगत व्हावे ह्या साम्याचीच अर्जुनाने उपासना करावी असे भगवंत सांगतात.

भगवंतांनी अर्जुनाला तू साम्याची उपासना कर म्हणजे तू परब्रह्म होशील असे सांगितले असले तरी पण साम्याची उपासना कशी करायची हे काही आपल्या लक्षात येत नाही परंतु संत मंडळींनी ह्याची अनुभूती घेतलेली असल्याने ते त्याचा उलगडा त्यांच्या अभंगातून करतात. त्यासाठी मनाला गोविंदाचा छंद लागावा अशी इच्छा नाथबाबा त्यांच्या अभंगातून व्यक्त करतात. गोविंदाचा छंद लागल्यावर त्यांना कोणती अनुभूती आली तेही ते अभंगातून सांगतात. ते म्हणतात,

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ।।1।। तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद । जसे रामरूप, नित्य गोविंद।।2।। तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी । गोविंद, नित्य गोविंद ।।3।। गोविंद हा जनी-वनी । म्हणे एका जनार्दनी।।4।।

क्रमश:

Advertisement
Tags :

.