‘जेटलींना सांगूनच मी देश सोडला’
पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्याचा दावा : लूकआउट बदलण्याबाबतही खुलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज समानी यांच्या पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्या यांनी पहिल्यांदाच अनेक मुद्द्यांवर परखड मतप्रदर्शन केले आहे. 2016 मध्ये देश सोडण्यापूर्वी आपण तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना संसदेत भेटलो होतो. यावेळी त्यांना लंडनला जात असल्याची माहिती दिल्याचा दावा मल्ल्या यांनी केला आहे. तसेच आपण जेटलींना बँक अधिकाऱ्यांसोबत बसून प्रकरण सोडवण्यास सांगण्याची विनंती केली होती, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बँकांनी 6,200 कोटींच्या बदल्यात आपल्याकडून 14 हजार कोटी रुपये वसूल केल्याचेही ते म्हणाले.
पॉडकास्टमध्ये मल्ल्या यांनी एलओसी (लूकआउट सर्क्युलर) बद्दल मोठा खुलासा केला. यापूर्वी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध एलओसी जारी केला होता. यामध्ये त्यांना देश सोडण्यापासून रोखण्याचे स्पष्ट निर्देश होते. परंतु नोव्हेंबर 2015 मध्ये हे परिपत्रक बदलण्यात आले. सुधारित परिपत्रकात जर मल्ल्याला देशाबाहेर जायचे असेल तर त्याची माहिती सीबीआयला द्यावी, त्यांना थांबवू नये, असे जोडण्यात आले. मात्र, त्यांना एलओसीमधील बदलाची माहिती नसल्यामुळे ते अनेकवेळा परदेशात पोहोचले होते.
पळून जाण्याचा आरोप फेटाळला
सर्वोच्च न्यायालयात हजर होण्याच्या एक दिवस आधी जाणूनबुजून देश सोडून पळून गेल्याचा दावा मल्ल्या यांनी पॉडकास्टमधून पूर्णपणे फेटाळून लावला. आपल्याला कोणत्याही न्यायालयाकडून कोणतेही समन्स मिळाले नव्हते आणि 2 मार्च 2016 रोजी देश सोडण्यापूर्वी कोणतीही सुनावणीही नियोजित नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे. माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त खळबळजनक पद्धतीने सादर करत त्यांना ‘फरार’ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, असेही मल्ल्या यांनी म्हटले आहे.
अरुण जेटलींच्या भेटीबाबत खुलासा
अरुण जेटलींशी झालेल्या आपल्या भेटीबद्दल सांगताना ही औपचारिक बैठक नसल्याचा खुलासा मल्ल्या यांनी केला. जेटली यांनी आधी या भेटीला नकार दिला होता परंतु नंतर त्यांनी भेट घेण्याची तयारी दर्शवली होती. ही भेट काँग्रेस खासदाराच्या दाव्यानंतर झाल्याचे बोलले जाते.
...तर देशात परतलोही असतो!
पासपोर्ट रद्द केल्यामुळे आपण भारतात परत येऊ शकलो नाही. जर सरकारचे हेतू स्पष्ट असते तर आपल्याला परत बोलावता आले असते, परंतु सरकारने केवळ दिखाव्यासाठी त्यांच्या प्रत्यार्पणावर कोट्यावधी रुपये खर्च केले. आपल्याविरुद्ध कोणताही प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध झालेला नाही; मी बँकांची लूट केलेली नाही, मनी लाँड्रिंग केले नाही, किंवा कोणत्याही हिंसक गुह्यात सहभागी नाही, असेही मल्ल्या यांनी म्हटले आहे.