जॉर्ज सोरोसशी माझे संबंध नाहीत : थरूर
15 वर्षे जुना ट्विट व्हायरल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील उद्योजक आणि गुंतवणुकदार जॉर्ज सोरोस याच्याशी असलेल्या संबंधांवरून काँग्रेस पक्ष आरोपांना सामोरा जात आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा एक 15 वर्षे जुना ट्विट व्हायरल झाला आहे. या ट्विटमध्sय थरूर यांनी अब्जाधीश सोरोस यांना जुना मित्र असे संबोधिले होते. अमेरिकन गुंतवणुकदार आणि उद्योजक जॉर्ज सोरोससोबत माझे कुठल्याही प्रकारचे आर्थिक आणि राजकीय संबंध नसल्याचा दावा थरूर यांनी केला आहे.
15 वर्षे जुन्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आणि अस्वस्थ जिज्ञासेचा परिणाम आहे. सोरोस सोबत माझे संबंध पूर्णपणे सामाजिक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात कार्यरत असताना मी न्यूयॉर्कचा एक प्रामाणिक आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन बाळगणारा रहिवासी म्हणून सोरोस यांना ओळखत होतो. सामाजिक व्यासपीठांवर ते माझे मित्र होते. मी कधीच त्यांच्याकडून किंवा त्यांच्या फौंडेशनकडून स्वत:साठी किंवा कुठल्याही संस्थेसाठी एक पैसाही घेतलेला नाही तसेच मागितला देखील नाही असा दावा थरूर यांनी केला आहे.
संबंधित ट्विटनंतर सोरोस यांना मी एकदाच भेटलो आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे तत्कालीन प्रतिनिधी हरदीप सिंह पुरी यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनावेळी त्यांची भेट झाली होती. तत्कालीन प्रतिनिधी पुरी यांनी अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठितांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी सोरोस यांच्यासोबत माझी चर्चा झाली. तेव्हापासून मी सोरोस यांच्या संपर्कात नाही. माझ्या जुन्या संबंधांचा कधीच कुठलाही राजकीय अर्थ राहिला नसल्याचा दावा थरूर यांनी केला आहे.
थरूर यांनी 15 वर्षे केलेला ट्विट आता व्हायरल होत आहे. मी जुना मित्र जॉर्ज सोरोस यांची भेट घेतली. ते भारत आणि आमच्या शेजारी देशासोबतच्या संबंधांवरून उत्साहित आहेत. ते एक गुंतवणुकदारापेक्षा अधिक एक चिंतेत असलेले जागतिक नागरिक आहेत असे थरूर यांनी नमूद केले होते.