कधीपर्यंत जिवंत राहणार ठाऊक नाही!
ट्रम्प यांचे वक्तव्य : अनेक लोकांच्या निशाण्यावर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मी कधीपर्यंत जिवंत राहणार हे मला ठाऊक नाही. मी अनेक लोकांच्या गोळीच्या निशाण्यावर असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याला दोन दिवसांपूर्वी त्यांच्या रिसॉर्टमध्ये झालेल्या घुसखोरीच्या घटनेशी जोडले जातेय.
रविवारी एक इसम ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो’ रिसॉर्टमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता, यावेळी सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत तो मारला गेला होता. युवक अवैध मार्गाने सुरक्षित भागात घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याकडे शॉटगन नसेच इंधनाचा कॅन होता असे सिक्रेट सर्व्हिसकडून सांगण्यात आले.
मारला गेलेला युवक 20 वर्षांचा होता आणि तो नॉर्थ कॅरोलिनाचा रहिवासी होता. सध्या त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. याप्रकरणी तपास केला जात आहे. तर घुसखोरीच्या घटनेवेळी अध्यक्ष ट्रम्प हे वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाइट हाउसमध्ये होते.. सर्वसाधारणपणे ते वीकेंडला मार-ए-लागो येथे वास्तव्य करत असतात.
रिसॉर्टच्या प्रवेशद्वारातून एक कार बाहेर पडत असताना युवकाने आत शिरण्याचा प्रयत्न केला होता. सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी त्याला रोखले आणि शस्त्र अन् कॅन खाली ठेवण्याची सूचना केली. युवकाने कॅन खाली ठेवला, परंतु शॉटगन फायर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तो मारला गेला. या इसमाच्या परिवाराने काही दिवसांपूर्वी तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.