भारताच्या स्ट्राइकनंतर खूप रडलो !
पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराने केले कबूल : सहकाऱ्याचे तुकडे-तुकडे झाले
वृत्तसंस्था/ लाहोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह कसूरीने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये त्याचा सहकारी दहशतवादी मुदस्सरच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाल्याचे मान्य केले. हे दृश्य पाहून मी मुदस्सरच्या अंत्ययात्रेत सामील होऊ शकलो नाही आणि खूप रडलो असे कसूरीने सांगितले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पीओके आणि पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा तसेच जैशच्या 9 अ•dयांवर हल्ले करत 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते. याच हल्ल्यात दहशतवादी मुदस्सर देखील मारला गेला होता.
भारताने मुरीदके येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मुदस्सर मारला गेला. मला त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्याची मंजुरी देण्यात आली नाही, त्याच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मी प्रचंड रडलो असे कसूरीने म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार
मुदस्सरच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे वरिष्ठ अधिकारी आणि सैन्याधिकारी सामील झाले होते. याचे छायाचित्रही समोर आले आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी मी स्वत:च्या क्षेत्रातील लोकांना भेटत होतो. भारताने मला या हल्ल्याचा सूत्रधार ठरविले. भारताने माजे शहर कसूरला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. आम्ही पुढील पिढीला जिहादसाठी तयार करत आहोत, आम्हाला मृत्यूचे भय नसल्याचा दावा कसूरीने केला आहे.