मला सहाव्यांदा विजयी केल्याने तुमच्यासमोर नतमस्तक...!
कोल्हापूर/ सेनापती कापशी
झालेली विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक वळणावरची होती. टोकाचा संघर्ष झाला, मात्र सामान्य माणूस आणि माझे कार्यकर्ते जीवाची बाजी लावून लढले. त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होत असल्याचे भावनिक उद्गगार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. सेनापती कापशी येथे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल चिकोत्रा खोऱ्यातील जनतेच्यावतीने केलेल्या भव्य नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, झालेली निवडणूक ही वेगळ्या वळणावरती होती. विरोधकांनी मला व माझ्या कुटुंबाला तुरुंगात घालून आमदार होण्याचे स्वप्न पाहिले होते. जातीयवादाचा आधार घेत प्रचंड मोठा अपप्रचार केला. माझ्या विरोधात अनेक शक्ती काम करत होत्या. पण सर्वसामान्य जनता, माझे कार्यकर्ते माझ्या बाजुला असल्याने विजय सुकर झाला. जनतेचे माझ्या वर अपार प्रेम आहे. त्यांचे पांग फेडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मुश्रीफ यांनी मनापासून सर्वसामान्य, गोरगरीब माणसांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांना कोणतंही मंत्री पद मिळाले तरी ते न्याय देण्याचा विचार करतात. तसेच त्यांनी गेल्या 70 वर्षात झाले नाही ते एका वर्षात केले. वैद्यकीय महाविद्यालय दुप्पट केली आहेत.
शशिकांत खोत म्हणाले, सलग सहावेळा निवडून येऊन नऊ वेळा मंत्री पदाची शपथ मंत्री मुश्रीफ यांनी घेतली,त्यांनी राजकारणाची व्याख्याच बदलली. कायमपणे जनतेच्या सेवेत आहेत. यावेळी मधुकर नाईक, शामराव पाटील, विजय काळे, सूर्याजी घोरपडे, बाबासो सांगले यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा बँक संचालक भैय्या माने, शेतकरी संघाचे चेअरमन प्रविणसिंह पाटील, अंकुश पाटील, सरपंच उज्जवला कांबळे, सौरभ नाईक, सुनील चौगले, अन्नपूर्णा शुगरचे संचालक तानाजी पाटील, सुभाष गडकरी, सोनुसिंग घाटगे, प्रदीप चव्हाण, आप्पासो तांबेकर, धनाजी तोरस्कर, जे. डी. मुसळे आदी उपस्थित होते. प्रवीण नाईकवाडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन विशाल कुंभार यांनी केले.
जेसीबीतून पुष्पवृष्टी...
मंत्री हसन मुश्रीफ हे सेनापती कापशीत आल्यानंतर जेसीबीतुन पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी ही करण्यात आली. एकूणच सत्काराचा कार्यक्रम भरगच्च उत्साहात पार पडला.
बोळावीवाडी सौर ऊर्जेवर...
आपल्या देशाला सूर्यप्रकाश ही लाभलेली दैवी देणगी आहे. आपण स्वत? पुढाकार घेऊन येथे प्रथम प्रयोग राबवला जाणार असून येथे सौर ऊर्जेवर सर्व काही चालणार आहे. त्यानंतर सौरऊर्जेचा प्रयोग सर्वत्र केला जाईल. याशिवाय निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. कोणतीही योजना बंद केली जाणार नाही.