कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुष्ट कौरवांकरता तू शोक करतोस याचा मला फारच विस्मय वाटतो

06:29 AM Oct 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

अर्जुन कौरवांच्याबरोबर युध्द करण्याचे टाळतो आहे. त्यासाठी निरनिराळी कारणे पुढे करतो आहे, हे पाहून भगवंतांना त्याच्या मूर्खपणाचा राग आला. जे लोक आत्मस्वरुपाला विसरतात ते मुर्खासारखे वागत, बोलत असतात. अर्जुन शिष्यभावाने भगवंतांना शरण गेला होता पण तेव्हढ्यात पुन्हा आलेल्या मोहाच्या लहरीमुळे खिन्न होऊन तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. मी काही झाले तरी लढणार नाही. असे बोलून तो स्तब्ध होऊन बसला. पुढील श्लोकात संजय म्हणाला, अर्जुन असा स्तब्ध बसलेला पाहून भगवंतांना विस्मय वाटला. त्यांनी त्याचा उपहास करून बोलायला सुरवात केली.

Advertisement

मग त्यास हृषीकेश जणू हसत बोलिला । करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा ।।10।।

माउली म्हणतात, वर वर पाहता उदास, कठोर पण आत अति सुरस, परिणामी, अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द भगवंत सांगू लागले. पुढील श्लोकात ते म्हणाले,

करिसी भलता शोक वरी ज्ञान हि सांगसी । मेल्या-जित्यावीषी शोक ज्ञानवंत हि जाणती ।। 11 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सुनावले की, तू हे जे बोलतो आहेस ते एक आश्चर्यच आहे. तू आपल्याला जाणता तर म्हणावतोस पण मूर्खपणा टाकत नाहीस. बरे, तुला काही शिकवावे म्हटले तर तू आम्हालाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागले तर तो जसा सैरावैरा धावत सुटेल तसे तुझे शहाणपण दिसते. तू स्वत:ला तर जाणत नाहीसच परंतु या कौरवांकरता शोक करतोस याबद्दल मला फारच विस्मय वाटतो.

येथे अर्जून स्वत:ला कर्ता समजत होता. त्यामुळे त्याला असे वाटत होते की, समोरील कौरव योद्धे त्याच्यामुळे मरणार आहेत. अर्जुनाची ही समजूत चुकीची होती कारण आपली कायमची ओळख आत्मा अशी असून, चालू जन्मातील ओळख ही आपली तात्पुरती ओळख आहे. तात्पुरती ओळख आणि कायमची ओळख, अशा दोनप्रकारच्या ओळखी प्रत्येकाच्याच असतात. अर्थातच अर्जुनाने हे लक्षात घेतले नसल्याने तो गोंधळला होता.

मी कर्ता आहे असे वाटू लागले की, समोर दिसणारे जग खरे आहे असे वाटू लागते. येथेही अर्जुनाच्या मनावर ह्या दोन्ही गोष्टी स्वार झालेल्या होत्या. अध्यात्मात ह्याला अज्ञान किंवा अविद्या असे म्हणतात. ह्या समजुतीतून मनुष्य सुखदु:ख अनुभवत असतो. स्वत:ला कर्ता समजल्यामुळे आप्तस्वकीय त्याच्याकडून युद्धात मारले जाणार असे अर्जुनाला वाटत होते आणि त्याचे त्याला फार वाईट वाटत होते. त्यांची व स्वत:ची सध्याची ओळख हेच खरी ओळख आहे असेही तो समजत होता. म्हणून भगवंत त्याला म्हणाले तू स्वत:ला तर जाणत नाहीस, तसेच या दुष्ट कौरवांकरता शोक करतोस याचा फारच विस्मय वाटतो.

त्याचा गैरसमज भगवंतांनी दूर करायचे ठरवले. ते म्हणाले, अर्जुना, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात. ते खोटे आहे काय? अरे येथे सर्व शक्तिमान असा कुणी आहे आणि त्याच्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात. हे जन्ममृत्यु तू उत्पन्न केले आहेस का? आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे का? तू यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर हे काय चिरंजीव होणार आहेत का? तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती तुझ्या चित्ताला झाली आहे. ती होऊ देऊ नकोस. ही सगळी सृष्टी अनादिसिद्ध असून आपोआप घडते व मोडते. मग तू शोक का करावास? पण मूर्खपणामुळे मनात आणू नये ते तू आणतोस आणि नीतीच्या गोष्टी मला सांगतोस. जन्म, मृत्यु ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करत नाहीत.

                क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article