‘मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’
पंतप्रधान मोदी यांचे खोचक प्रतिपादन, ‘लखपती दीदीं’शी साधला गुजरातमध्ये संवाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘मी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. माझ्या बँक खात्यात कोट्यावधी माता-भागिनींचे आशीर्वाद आहेत. या आशीवार्दांचे धन सातत्याने वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी मी महाकुंभपर्वणीच्या काळात प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले, तेव्हा मला गंगामातेचे आशीर्वाद मिळाले. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मला कोट्यावधी महिलांचे आशीर्वाद मिळाले आहेत. आशीवार्दाच्या या धनाला जगात तोड नाही,’ असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नवसारी येथील जनसभेत शनिवारी काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गुजरातच्या दीड लाख लखपती दिदींशी ऑन लाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. नवसारी येथे जाण्यापूर्वी यांनी उघड्या जीपमधून जवळपास एक किलोमीटर अंतराचा रोड शो केला. सर्वसामान्य नागरीकांसह भारतीय जनता पक्षाचे अनेक कायकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महिलांच्या सबलीकरणाला प्राधान्य
केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये महिलांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या. त्यांचे उत्तम प्रकारे कार्यान्वयन केले. महिलांचे कल्याण करताना किंवा योजना लागू करताना आम्ही हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला नाही. तोंडी तत्काळ तीन तलाकसारखी दुष्प्रथा आम्हीच मोडून काढली आहे. लाखो मुस्लीम महिलांना आम्ही बर्बाद होण्यापासून वाचविले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 आम्ही निष्प्रभ केला. यामुळे त्या भागातील सर्व महिलांना त्यांचे अधिकार परत मिळाले आहेत. पूर्वी त्या मूलभूत अधिकारांपासून वंचित होत्या. मागच्या सरकारांना केवळ मतांचे राजकारण करायचे होते. त्यामुळे त्यांनी महिलांची चिंताच केली नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
मातृत्व रजा 26 आठवड्यांची
आज सामाजिक क्षेत्रांपासून क्रीडा क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करीत आहेत. 2014 पासून अनेक महत्वपूर्ण पदांवरील महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र सरकारमध्ये आज सर्वाधिक संख्येने महिला मंत्री आहेत. तर 2019 मध्ये प्रथमच आमच्या संसदेत 78 महिलांचा सहभाग राहिला. पूर्वीच्या सरकारांच्या काळात महिलांना मातृत्व रजा केवळ 12 आठवड्यांची मिळत होती. आता ती 26 आठवड्यांची करण्यात आली आहे. गर्भवती महिलांना संरक्षण आणि पोषणाची आवश्यकता असते. ते लक्षात घेऊन हे परिवर्तन करण्यात आले आहे. विरोधक सत्तेवर असतानाच्या काळात त्यांनी या साध्या बाबींकडेही दुर्लक्ष केले होते. आमच्या कामांमुळे आम्ही महिलांचा विश्वास कमावला. आमच्या योजनांची फळे आता चाखावयास मिळत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गुजरातमध्ये दूधक्रांती
गुजरातमध्ये आमच्या सत्ताकाळात घडलेल्या दूधक्रांतीचे श्रेय येथील वनवासी समुदायांच्या लक्षावधी महिलांचे अनन्यसाधारण योगदान आहे. सरकारनेही या दुधाचे पैसे या महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करुन त्यांना त्यांच्या परिश्रमांचा परतावा मिळवून दिला. यामुळे या पैशावर हात मारणाऱ्या दलालांच्या तावडीतून त्यांची सुटका झाली आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी कथन केली.
सुरक्षेसाठी महिला अधिकारीच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गुजरातमधील कार्यक्रमात त्यांच्या महिला पोलिस अधिकाऱ्यांचेच सुरक्षा कवच देण्यात आले होते. हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्या म्हणून चर्चिले जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांना महिला सुरक्षाकर्मींचे संरक्षण मिळाल्याने ही घटना प्रसंगोचित ठरली असून तिचे कौतुक होत आहे.

दीड लाख महिलांचा सन्मान
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वानसी-बोरसी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुजरातमधील दीड लाख लखपती भगिनींशी ऑन लाईन संवाद साधला आहे. या कार्यक्रमात नवसारी, बलसाड आणि डांग जिल्ह्यांमधील अनेक लखपदी दीदींनी सहभाग घेतला. महिलांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या आणि त्यांना बळ मिळवून देणाऱ्या योजनांवर आमचा भर आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमात गुजरातच्या महिलांनी केलेल्या प्रगतीसंबंधी एक लघुचित्रपटही प्रदर्शित करण्यात आला होता. महिलांचा प्रतिसाद या कार्यक्रमाला उत्तम लाभला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या योजना
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मिडिया खाते महिलांच्या स्वाधीन
ड सुरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 किलोमीटर लांबीचा रोड शो
ड नवसारी येथील कार्यक्रमावेळी त्यांना महिला अधिकाऱ्यांकडून सुरक्षा
ड दादरा-नगरहवेलीतही पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद