माझ्या अनन्य भक्ताच्या अंतकाळी मी आपणहून तेथे हजर असतो
अध्याय आठवा
माउली म्हणतात, इंद्रियांवर संयम करून त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी इंद्रियनिग्रह करून जे मिळणार आहे ते खूपच मौल्यवान आहे हे मनाच्या लक्षात आणून दिले की, ते ताळ्यावर येते आणि बाह्य विषयातून लक्ष काढून घेते.
ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत जो भगवंतांचे स्मरण करत देहाचा त्याग करतो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला जातो ह्या अर्थाचा
मुखे ?-ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी। ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ।। 13 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, योगाचरणी स्थित झालेला योगी अंत्यसमयी ओंकाराचे स्मरण करत असतो. एकाक्षरी हे ओंकाराचे स्मरण थांबते आणि श्वास रोखला जातो. अशावेळी फक्त पूर्णब्रह्माचे अस्तित्व राहते.
प्रणव हे नाव असलेले एकाक्षर ब्रह्म हे माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करत असताना जो देहत्याग करतो, तो माझ्या स्वरूपात मिसळून जातो.
ह्यावर भगवंतांना असे वाटले की, आता अर्जुन असे म्हणेल की, अंतकाळी माझे स्मरण करण्याचे भान तरी राहील का? कारण मृत्यूसमयी इंद्रिये आपापली कामे करण्यास असमर्थ असल्याने जगण्यात असलेले सुख नाहीसे होते. आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर योगसाधना कोण करेल? इंद्रियांचा निग्रह कोण करेल? आणि कोणत्या अंत:करणाने ओंकाराचे स्मरण करेल? म्हणून भगवंत म्हणाले, जे माझी नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, पार्था, जो सतत अनन्यचित्त होऊन माझे नित्य स्मरण करतो, तो सुखाने मला येऊन मिळतो.
अनन्य-चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर। सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो ।। 14 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, विषयांना तिलांजली देऊन, स्वभावाला आवर घालून मला अंत:करणात साठवून माझ्या स्वरूपाचा जे अनुभव घेतात त्यांना तहानभुकेचा पत्ता नसतो, तेथे ज्ञानेंद्रीयाना कोण विचारतो? अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंत:करणाने मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. अशा माझ्या प्रिय भक्तांवर जेव्हा देह सोडण्याची वेळ येते त्यावेळी त्यांनी माझी आठवण काढली तरच मी त्यांच्याकडे जावे असे घडत असेल तर त्यांनी केलेल्या भक्तीचे मी काय चीज केले असे होईल. माझ्या प्रिय भक्ताला त्याच्या बिकट प्रसंगी मी वाऱ्यावर कसा सोडेन? अरे माझ्या दयाळूपणाचे मी काय वर्णन करू? समज एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयी जरी काकुळतीला येऊन, देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकटासमयी मी धावत जातो इतका मी दयाळू आहे, असे असताना माझ्या भक्तालाही दीनवाणेपणाने काकुळतीला येऊन मला हाक मारावी लागत असेल तर मग त्याने माझी अनन्य भक्ती करून काय साधले असे होईल परंतु भक्तावर काकुळतीने मला हाक मारायची वेळच मी येऊ देत नाही. त्याने हाक मारायच्या आधीच मी तेथे हजर असतो ह्याबद्दल अर्जुना मनात बिलकुल शंका बाळगू नकोस.
क्रमश: