मी देखील मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार : काशप्पनवर
बेंगळूर : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांकडून लॉबिंग सुरू झाली आहे. बागलकोट जिल्ह्यातील आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी, मी देखील मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये राज्य राजकारणात मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखविली आहे. बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम येथे बोलताना ते म्हणाले, मी देखील मंत्री बनण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचना करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. नुकताच मी देखील मंत्रिपदाची मागणी केली आहे, असे सांगून त्यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले आहे.