ह्युंडाई सर्वात मोठा आयपीओ करणार लाँच
कंपनी 25,000 कोटी रुपये उभारणार : ऑक्टोबरमध्ये इश्यू येण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ह्युंडाई या दक्षिण कोरियाच्या कंपनीची सहकारी कंपनी ह्युंडाई मोटार इंडिया भारतीय शेअरबाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी करत आहे. कंपनी दिवाळीच्या आसपास आयपीओ लाँच करू शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सदरचा आयपीओ आणण्याचा कंपनीचा बेत असून संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनात सुमारे 10 टक्के स्टेक विकणार असल्याची माहिती आहे.
त्यानुसार, प्रस्तावित आयपीओची किंमत सुमारे 25 हजार कोटी रुपये असेल. असे झाल्यास हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ राहणार आहे, असे म्हटले जात आहे. 2022 मध्ये, सरकारने एलआयसीमधील 3.5 टक्के हिस्सा विकला. यासाठी सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यात आला होता.
चौथी सर्वात मोठी सूचीबद्ध ऑटो कंपनी असेल
ह्युंडाई मोटार इंडिया आयपीओसाठी अनेक बँकांशी बोलणी करत आहे. ह्युंडाई मोटर भारताच्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यास, मारुती-सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा नंतर ती चौथी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असेल. मारुतीनंतर ह्युंडाई मोटर इंडिया ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी आहे.