ह्युंडाई मोटरचा आयपीओ 15 ऑक्टोबरला होणार खुला
ऑटो क्षेत्रातला दुसरा आयपीओ : 3 अब्ज डॉलर्सची उभारणी
नवी दिल्ली :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी ह्युंडाई मोटर इंडिया यांचा आयपीओ पुढील आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजारात दाखल केला जाणार आहे. सदरच्या आयपीओची इशु किंमत 1865-1960 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. आयपीओ सादरीकरणाबाबतची माहिती कंपनीने शेअरबाजाला दिली आहे.
कधी येणार आयपीओ
या आयपीओच्या माध्यमातून ह्युंडाई 3 अब्ज डॉलर्सची उभारणी करणार असल्याचे समजते. सदरचा आयपीओ 15 ऑक्टोबरला शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. संस्थांत्मक गुंतवणूकदारांना 14 ऑक्टोबरला आणि 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान रिटेल व इतर गुंतवणूकदारांना आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.
ऑटो क्षेत्रातला दुसरा आयपीओ
ऑटो क्षेत्रातला आयपीओ पाहता मारुतीनंतर ह्युंडाईचा दुसरा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये मारुती सुझुकी इंडिया यांचा आयपीओ शेअरबाजारात दाखल झाला होता. त्यानंतर सुमारे दोन दशकानंतर दक्षिण कोरियन कंपनी ह्युंडाईचा भारतात आयपीओ सादर होत आहे. सदरचा ह्युंडाई मोटरचा समभाग शेअरबाजारात 22 ऑक्टोबरला सुचिबद्ध होणार असल्याची माहिती देखील मिळते आहे.
पहिली इलेक्ट्रीक कार कधी येणार?
कंपनी पुढील वर्षांच्या प्रारंभी आपली पहिलीवहिली भारतात तयार झालेली इलेक्ट्रीक कारगाडी लॉन्च करण्याची तयारी बनवत आहे. यासोबतच गॅसोलाईन इंधनावर 2 गाड्या सादरीकरणाची योजनाही कंपनीने आखली आहे. या दोन्ही योजनांबाबत कंपनी सखोलपणे कार्य करत आहे.