ह्युंडाईकडे दुर्मिळ खनिजांचा वर्षाचा साठा
चीनच्या बंदीमुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचा कंपनीचा दावा
नवी दिल्ली :
वाहन निर्मितीमधील मुख्य कंपनी ह्युंडाई मोटर यांच्याकडे दुर्मिळ खनिजांचा साठा सुमारे एक वर्ष पुरेल इतका आहे. अल्पावधीत चीनच्या निर्यात निर्बंधांचा त्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असेही कंपनीने सांगितले.
एप्रिलमध्ये, चीनने दुर्मिळ खनिजे आणि संबंधित चुंबकांच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यांच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील ऑटो निर्माते, एरोस्पेस उत्पादक, सेमीकंडक्टर कंपन्या आणि लष्करी कंत्राटदारांच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी असलेल्या ह्युंडाईचा साठा, तिच्या संलग्न किआ कॉर्पसह, हे दर्शविते की ती फोर्ड आणि बीएमडब्ल्यूसह तिच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे.
चीनच्या निर्यात निर्बंधांमुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या उत्पादन आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती करताना सांगितले की, अलीकडेच जेव्हा चीनने त्यांच्या काही निर्यात निर्बंधांमध्ये शिथिलता आणली तेव्हा ह्युंडाईने त्यांच्या दुर्मिळ पृथ्वीच्या साठ्यात झपाट्याने वाढ केली.
मारुतीच्या उत्पादनावर होणार परिणाम
याचदरम्यान देशातील दिग्गज कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीवर मात्र चीनच्या दुर्मिळ धातुच्या निर्बंधाचा परिणाम होणार असल्याची माहिती आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे इलेक्ट्रीक वाहन इ विटाराच्या उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे. उत्पादनात दोन तृतियांशने घट होणार आहे. धातुच्या पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने 8200 इतक्याच विटाराचे उत्पादन घेतले जाणार आहे. यापूर्वी 26,500 गाड्यांचे उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. तरीही 67 हजार इलेक्ट्रीक कार्सचे उत्पादन मार्च 2026 पर्यंत घेण्याचे कंपनीने ठरवले आहे.