नव्या वर्षापासून ह्युंडाई कार्स 25,000 नी महागणार
वृत्तसंस्था/मुंबई
नवीन वर्षापासून ह्युंडाईच्या गाड्या 25,000 रुपयांनी महागणार आहेत. अंतर्गत व निर्मिती खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेले दर 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर लागू होणार आहेत. ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग म्हणाले, ‘खर्चाचा जास्तीत जास्त भार हा अंतर्गत रित्या झेलण्याचे प्रयत्न कंपनी करत असते. जेणेकरून आमच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही. तथापि, अंतर्गत खर्चात सतत वाढ झाल्यामुळे, किमतींमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक बनले आहे.’ नोव्हेंबरमध्ये ह्युंडाईची विक्री 7 टक्के आणि निर्यात 20 टक्क्यांनी घसरली आहे. ह्युंडाईने नोव्हेंबरमध्ये एकूण 61,252 कार्स विकल्या, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 7 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 65,801 वाहनांची विक्री केली होती.
नोव्हेंबरमध्ये विक्री, निर्यात घटली
त्याचवेळी, देशांतर्गत बाजारात ही घसरण 2 टक्के आहे. कंपनीने नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत 49,451 कार्स विकल्या, ज्या नोव्हेंबर 2024 मध्ये घसरून 48,246 वर आल्या. याशिवाय, गेल्या महिन्यात कंपनीच्या निर्यातीत 20 टक्के घट झाली आहे. कंपनीने यावर्षी नोव्हेंबरमध्ये विदेशी बाजारात 13,006 वाहने विकली आहेत, जी गेल्या वर्षी 16,350 होती.
सप्टेंबर तिमाहीत नफा घटला
जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 16 टक्के घट झाली आहे. ह्युंदाई मोटार इंडियाने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 1,375 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. ते वर्ष-दर-वर्ष आधारावर 16.5 टक्केनी कमी झाले आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 1,628 कोटी रुपयांचा नफा झाला होता.