पंजाबसमोर आज हैदराबादचे आव्हान
वृत्तसंस्था
हैदराबाद : आज बुधवारी येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आत्मविश्वासाने भारलेल्या सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना पंजाब किंग्सच्या फलंदाजांवर आपली चिंताजनक घसरण थांबवण्याचा दबाव असेल. सलग सहा विजय मिळवून एक बलाढ्या संघ म्हणून उदयास आलेला पंजाब मागील दोन सामन्यांमध्ये अडखळला आहे आणि या दोन्ही पराभवांनी संघातील कमकुवत दुवे उघड केले आहेत. त्यावर ते लवकरात लवकर उपाययोजना करण्यास उत्सुक असतील.
पंजाब नऊ सामन्यांमधून 13 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी असूनही चुकांना वाव खूपच कमी आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे सर्व संघ केवळ एका गुणाने मागे आहेत. पंजाबच्या अलीकडील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे लय गमावणे. त्यांच्या फलंदाजीतील स्फोटक कामगिरीने हंगामातील बहुतेक काळ त्यांच्या अस्थिर गोलंदाजीची उणीव झाकून टाकली होती, परंतु आता त्यातील त्रुटी दिसू लागल्या आहेत.
सुऊवातीच्या टप्प्यात खेळाची दिशा ठरवणारी आघाडीची फळी आता अपयशी ठरली आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनोली या युवा त्रिकुटाच्या आक्रमक दृष्टिकोनाने बेपर्वाईचे स्वरूप धारण केले आहे, ज्यामुळे सुऊवातीलाच धक्के बसले आहेत आणि मधल्या फळीवर डाव सावरण्याची जबाबदारी आली आहे. त्याचबरोबर मधल्या फळीला अर्थपूर्ण भागीदारी रचण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. सांघिक पुनर्बांधणीऐवजी अनेकदा वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून राहिल्यामुळे कमी धावा झाल्या आहेत आणि लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडखळला आहे.
संपूर्ण हंगामात पंजाबचा कमकुवत दुवा राहिलेल्या गोलंदाजी विभागाने फारसा दिलासा दिलेला नाही. विजयी सामन्यांमध्येही गोलंदाजांनी विरोधी फलंदाजांना टप्प्याटप्प्याने मुक्तपणे धावा करण्याची संधी दिली आहे आणि महत्त्वाच्या क्षणी त्यांच्यातील शिस्तीच्या अभावामुळे डाव संपवणे ही एक सततची समस्या बनली आहे. स्पर्धा आता अधिक चुरशीच्या टप्प्यात प्रवेश करत असताना पंजाबला अधिक अचूक अंमलबजावणी आणि स्पष्ट योजनांची आवश्यकता असेल. विशेषत: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर सनरायझर्सच्या बलाढ्या फलंदाजी फळीविऊद्ध त्यांना याची जास्तच गरज भासेल.
दुसरीकडे, तिसऱ्या स्थानावर असलेला सनरायझर्स संघ कोलकाता नाईट रायडर्सकडून सात गडी राखून झालेल्या पराभवातून सावरण्यासाठी उत्सुक असेल. सदर पराभवामुळे त्यांची पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली तसेच पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधीही गमवावी लागली.
संघ-सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), सलील अरोरा, इशान किशन, हेन्रिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, रविचंद्रन अश्विन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, क्रेन्स फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, कामिंदू मेंडिस, नितीश कुमार रे•ाr, हर्षल पटेल, शिवम मावी, शिवांग कुमार, अमित कुमार, जेराल्ड कोएत्झी, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, दिलशान मदुशंका, एशान मलिंगा, ओंकार तरनाळे, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिशेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, कूपर कॉनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विशाल निषाद, पायला अविनाश, विष्णू विनोद.
सामन्याची वेळ: संध्याकाळी 7.30 वा.