हैदराबादच्या युवकाची अमेरिकेत हत्या
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
हैदराबाद येथील एका युवकाची अमेरिकेच्या वॉशिंग्टन अॅव्हेन्यू येथे हत्या करण्यात आली आहे. या युवकाचे नाव रवितेजा असे असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर रविवारी हल्ला करण्यात आला होता. स्थानिक पोलीस या घटनेची चौकशी करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
रवितेजा हा हैदराबाद येथील आरके पुरमचा रहिवासी होता. मार्च 2022 मध्ये त्याने अमेरिकेत मास्टर्स पदवी मिळविण्यासाठी तेथे स्थलांतर केले होते. नुकताच त्याने आपला मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि तो अमेरिकेत कामाच्या शोधात होता. आपल्या पुत्राचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणले जावे, अशी विनंती त्याचे पिता कोय्यादा चंद्रमौली यांनी दोन्ही देशांच्या सरकारांना केली आहे. त्याचे पार्थिव पाहण्यासाठी तरी आपण जीवित राहू की नाही, याची शाश्वती नाही, असे उद्गार चंद्रमौली यांनी पत्रकारांसमोर भावनावेगात काढले आहेत.