हैदराबादच्या तरुणाचा युक्रेनच्या युद्धात मृत्यू
रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून सेवा : 13 दिवसांपूर्वी गुजरातमधील तरुणाने गमावला होता जीव
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादमधील मोहम्मद अस्फान या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून काम करत होता. अस्फानच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी ‘आयएम’चे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे मदत मागितली आहे.
भारतातील हैदराबाद शहरातील रहिवासी असलेल्या 30 वषीय अस्फानचा रशिया-युक्रेन युद्धात मृत्यू झाला. एका एजंटने आपली फसवणूक करून रशियन सैन्यात भरती केल्याचे मोहम्मद अस्फानने अलिकडेच सांगितले होते. त्यानंतर या कुटुंबाने हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडेही मदतीचे आवाहन केले होते. यानंतर ओवैसी यांनी मॉस्कोमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधत अस्फानची माहिती घेतली. ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच अधिकाऱ्यांनी युद्धक्षेत्रात त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धात भारतीयाचा मृत्यू झालेला हा पहिलाच प्रसंग नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस रशियामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला. हा 23 वषीय तरुण गुजरातचा रहिवासी असून रशियन सैन्यात सुरक्षा मदतनीस म्हणून रुजू झाला होता. रशियन सैन्याने सुरक्षा सहाय्यक म्हणून नियुक्त केलेल्या गुजरातमधील 23 वषीय व्यक्तीचा 21 फेब्रुवारी रोजी युक्रेनच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता, या हल्ल्यातून बचावलेल्या अन्य एका भारतीय कर्मचाऱ्याने सांगितले. त्याला रशिया-युक्रेन सीमेवरील डोनेस्तक भागात तैनात करण्यात आले होते. क्षेपणास्त्र हल्ला झाला तेव्हा त्याला गोळीबार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
काही भारतीय तरुणांना रशियन सैन्यात भरती करण्यात आल्याचे यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले आहे. काही एजंट्सच्या माध्यमातून भारतीयांची रशियन सैन्यात भरती केल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली होती. रशियात अडकलेल्या भारतीय तऊणांचे कुटुंबीय सतत भारत सरकारकडे मदतीचे आवाहन करत आहेत. रशियात अडकलेल्यांना परत आणून फसवणूक करून पाठवणाऱ्या एजंटांवर कारवाई करावी, अशी मागणी या कुटुंबांनी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.