संघाकडून झाले हैद्राबादचे ‘भाग्यनगर’
भव्य कार्यक्रमात सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवीत
वृत्तसंस्था / हैद्राबाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तेलंगणाची राजधानी हैद्राबादचे नामकरण ‘भाग्यनगर’ असे केले आहे. हे नामकरण सांकेतिक असून भारताचा सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवीत करण्याचा हा उपक्रम आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येथे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हा नामकरण सभारंभ झाला.
हैद्राबाद या नावापूर्वी या शहराचे नाव ‘भाग्यनगर’ हेच होते. मुस्लीम दक्षिण भारतात मुस्लीम आक्रमणानंतर निजामशाहीच्या काळात या शहराचे नाव हैद्राबाद असे करण्यात आले. भारताच्या विविध शहरांचा उल्लेख त्यांच्या परकीय आक्रमाण्याच्या पूर्वीच्या मूळ नावानेच करण्याची या संस्थेची परंपरा आहे. या नामकरण कार्यक्रमाच्या आधीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक संपर्कपत्रांमध्ये या शहराचा उल्लेख ‘भाग्यनगर महानगर’ असा करण्यात आलेला आहे.
‘प्रज्ञा प्रवाह’चा उपक्रम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित प्रज्ञा प्रवाह नामक एका सांस्कृतिक संस्थेचे अधिवेशन या शहरात होणार आहे. ‘लोकमंथन’ या नावाने हे अधिवेनश आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या सज्जतेसाठी या संघटनेचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक आतापासून काम करीत आहेत. या कार्यक्राचा एक भाग म्हणून हैद्राबाद शहराचे सांकेतिक नामकरण भाग्यनगर असे करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी बुधवारी दिली आहे.
किशन रेड्डी यांचा सहभाग
‘लोकमंथन’ या अधिवेशन कार्यक्रमाच्या स्वागत समितीचे अध्यक्षपद केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री किशन रे•ाr यांनी स्वीकारले आहे. स्वागत समितीत हैद्राबाद आणि आंध्र प्रदेशातील विविध क्षेत्रांमधील 120 मान्यवरांचा समावेश आहे. प्रज्ञा प्रवाह या संस्थेचा हा चौथा लोकमंथन कार्यक्रम असून त्यासाठी यावेळी या शहराची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
वसाहतवादी मानसिकतेचा विरोध
परकीय आक्रमकांनी भारताच्या शहरांना दिलेली नावे पुसून टाकण्याचा उद्देश भारताचा स्वाभिमान जागृत करणे हा आहे. वसाहतवादी मानसिकतेचा विरोध करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या संस्थांचे ध्येय आहे. स्वाभिमान जागृत झाल्याखेरीज भारताची प्रगती खऱ्या अर्थाने होणार नाही, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा असून त्या दिशेने संघाने आपल्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली आहे.