क्षणात होत्याचे नव्हते झाले ! पायावरील चिखल धुताना पत्नीचा अचानक पाय घसरला; पतीने क्षणाचाही विलंब न करता कालव्यात उडी घेतली, खोल पाणी आणि वेगवान प्रवाहामुळे दोघांचाही अंत
पवनी (भंडारा): भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामधील कोरंभी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पती-पत्नीचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. पायावरील चिखल धुण्यासाठी कालव्याच्या पायऱ्यांवर उतरलेल्या पत्नीचा अचानक पाय घसरून ती खोल पाण्यात पडली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने क्षणाचाही विलंब न करता कालव्यात उडी घेतली; मात्र खोल पाणी आणि वेगवान प्रवाहामुळे दोघांचाही अंत झाला. या घटनेने कोरंभी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे स्वप्नील अशोक बनकर (२९) आणि प्रज्ञा स्वप्नील बनकर अशी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी स्वप्नील आणि प्रज्ञा हे शेतातून घरी परतत होते. कालव्याजवळ आल्यानंतर पायावरील चिखल धुण्यासाठी ते पायऱ्यांवर उतरले. याच वेळी प्रज्ञा यांचा अचानक पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या. स्वप्नील यांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली. वेगवान प्रवाह असल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. काही क्षणांतच या दाम्पत्यावर काळाने घाला घातला.
