Satara News: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा, मेव्हुणीवरही केला होता हल्ला
अरुण बिरामणे याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता
सातारा : चारित्र्याचा संशय घेवून पत्नीचा खून करून मेहुणीलाही मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी जन्मठेप आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. अरुण परबती बिरामणे (वाघजाईवाडी ता. वाई) असे आरोपी पतीचे नाव आहे.
22 नोव्हेंबर 2016 रोजी पत्नी निलम अरुण बिरामणे हिच्या चारित्र्याचा संशय येवून तिच्यावर धारदार शास्त्राने वार करून तिचा खून केला. मेव्हणी वर्षा ही बहिणीस सोडविण्यास गेली असता तिच्यावरही धारदार शास्त्राने वार करून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. या कारणास्तव अरुण बिरामणे याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक विनायक वेताळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. होवाळ यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. मागील दोन वर्षापासून या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्यासमोर सुरू होती. पैरवी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, मोहसीन शेख यांनी परिश्रम घेतले.
न्यायालयीन कामकाजात पोलीस शिपाई भुजंगराव काळे, किर्तीकुमार कदम, हेमलता कदम यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. वाई येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय झाल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे.