पत्नीकडून पतीचा गळा आवळून खून
कुरुबर कुटुंबीयांचे न्यायासाठी आंदोलन
वार्ताहर/विजापूर
संशयातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना बबलेश्वर तालुक्यातील हळगणीजवळील शेतात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शंकप्पा विठ्ठल कुरुबर (वय 32) असे मृताचे नाव आहे. मल्लम्मा कुरुबर असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावरोधात बबलेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, मूळचे संगापूर गावचा असलेल्या शंकप्पा याचा विवाह ममदापूर येथील मल्लम्मा हिच्याशी झाला होता. पतीसोबत चार-पाच वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर या दाम्पत्याला आरती नावाची मुलगी झाली. मात्र काही वर्षांपूर्वी पतीसोबत भांडण झाल्याने मल्लम्मा माहेरी निघून गेली होती. दोन महिन्यांपूर्वी वडीलधाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर पती-पत्नी पुन्हा एकत्र आले.
शंकप्पा आपल्या नातेवाईकांच्या हळगणीजवळील शेतात झोपडी उभारून पत्नी व मुलीसह वास्तव्यास होता. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. पती आपल्यावर संशय घेत असल्यामुळे मल्लम्मा चिडलेली होती. सोमवारी रात्री शंकप्पा झोपेत असताना मलम्मा हिने आपल्या ओढणीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले जाते. सकाळी शंकप्पाचा भाऊ घरी आला असता शंकप्पा पलंगावर मृतावस्थेत आढळून आला. आईने वडिलांचा खून करताना पाहिल्याचे मुलगी आरती हिने सांगितले आहे.दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या शंकप्पा यांच्या नातेवाईक व नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले.
या प्रकरणात पत्नी मल्लम्मासोबत आणखी चार जण सहभागी असून त्यांना अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मल्लम्माचे गावातील चार व्यक्तींशी संबंध होते. त्याबाबत पतीने जाब विचारल्यामुळेच तिने त्यांच्यासोबत मिळून पतीचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना मुलगी आरती हिने प्रत्यक्ष पाहिल्याचेही सांगण्यात आले आहे. बबलेश्वर पोलिसांनी मल्लम्मासह आणखी चार जणांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावले होते. मात्र दबावामुळे त्या चार जणांना सोडून देण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे.