Satara Crime | सातारा पालिकेत 'पतीराजां'चा सुळसुळाट; नगरसेविकांच्या पतींच्या हस्तक्षेपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार!
साताऱ्यात नगरसेविकांच्या पतींच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी
सातारा : सातारा नगरपालिकेत निवडणूक झाल्यापासून नगरसेविकांच्या पतींची वर्दळ, कामामध्ये हस्तक्षेप वाढला असून त्याबाबतची लिखीत तक्रार थेट राज्याच्या निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह करण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या सहाय्यक आयुक्त आरती सरवदे आहेर यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना योग्य ती कार्यवाही करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडूनही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मागवली असल्याचे सांगण्यात आले.
सातारा नगरपालिकेत निवडणुकीच्या काळानंतर ५० टक्के महिला आरक्षणावर निवडून आलेल्या नगरसेविकांच्या पतींचे हस्तक्षेप वाढलेले आहेत. त्याबाबतची थेट तक्रार एका तक्रारदाराने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. सातारा नगरपालिकेत दररोज उठबस करुन नाहक अधिकाऱ्यांना जुन्या रेकॉ ईस काढायला लावून कागदपत्रांचा दुरुपयोग करणे, फोनवरुन आदेश देणे, नगरसेविकांऐवजी त्यांच्या पतीकडूनच काम सांगणे, आदी प्रकारचा हस्तक्षेप वाढत असल्याने महिला आरक्षणाची पायमल्ली होत आहे.
त्याबाबत पालिकेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता नगरसेविकांच्या पतींचे कारनामे दृष्टीक्षेपात येतील त्यामुळे कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी अशी लेखी तक्रार तक्रारदाराने राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून त्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना राज्य निवडणूक आयोगाच्या सहाय्यक आयुक्त आरती सरवदे आहेर यांनी पत्र पाठवून विद्यमान नगरसेविकांच्या पतींचा कारभारात अनाधिकृत हस्तक्षेप होत असल्याची तसेच महिला आरक्षणाचा गैरवापर होत असल्याची चौकशी करुन अहवाल पाठवावा, असे सुचित केले असून त्या पत्रानुसार सातारा पालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती मागवली असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय संसदेत महिला विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. परंतु पुरेशा संख्याबळाअभावी ते फेटाळण्यात आले. त्यानंतर मोठा गदारोळ देशात सुरू असतानाच महिला सत्तेत असताना त्यांच्या पतींची लुडबुड मात्र कमी होत नाही.