पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; पतीला ५ वर्षे कारावास
प्रतिनिधी / ओरोस
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा खूनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या मालवण पराड येथील अशोक राजाराम शिंगरे (६२) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सानिका जोशी यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ४ नोव्हेंबर २०१८ रोजी पत्नी सिमाली झोपलेली असताना रात्री ११ च्या सुमारास पती अशोक याने तिच्यावर लोखंडी पाईपने वार केले होते. उपचारानंतर ती बरी झाली होती. दरम्यान त्यांचा मुलगा सिद्धेश याने याबाबतची तक्रार पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केला होता. न्यायालयात झालेल्या खटल्याच्या सुनावणीत आरोपीची पत्नी, मुलगा, मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. भारतीय दंड विधान ३०७ अन्वये आरोपील दोषी धरून न्यायलयाने शिक्षा सुनावली.