Crime News Satara: चरित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
दाजीने मेहुण्यावर केला चाकूने हल्ला
सातारा: सातारा शरातील यादोगोपाळ पेठेत शुक्रवारी सकाळी 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला. अंजली राजेंद्र शिंदे (मूळ रा. करंजे पेठ, सातारा) असे पत्नीचे नाव आहे. तर राजेंद्र शिंदे (वय 32, मूळ रा. पानमळेवाडी ता. सातारा) असे पतीचे नाव आहे. त्याने अंजलीचा मृतदेह खॉटखाली लपवून ठेवला होता.
ही बाब मृत विवाहितेचा भाऊ श्रेयस अनिलकुमार पाटील (वय 20, रा. करंजे पेठ सातारा) याला कळाली. यानंतर तो बहिणीच्या घरी गेला. त्याला पाहून राजेंद्र शिंदे दारूच्या नशेत चाकू घेऊन त्याला मारण्यासाठी गेला. यावेळी दोघांच्यात झटापट झाली. या झटापटीत राजेंद्र शिंदे जखमी होऊन बेशुद्ध झाला. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यादोगोपाळ पेठेत राहत असलेले अंजली व राजेंद्र शिंदे यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली. राजेंद्र हा सेंट्रींगचे काम करत होता. त्यांना 9 व 10 वर्षाच्या दोन मुली आहेत. राजेंद्र यांना दारूचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसापासून तो अंजलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार तिच्यासोबत भांडणे करत होता.
शुक्रवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. या वादाबाबत तिने भाऊ श्रेयस पाटील याला सांगितले. परंतु सकाळी 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास राजेंद्रने तिचा खून केला. तिचा मृतदेह घरातील खॉट खाली लपवून ठेवला. राजेंद्र दारूच्या नशेत असल्याने तो दिवसभर घरात होता.
श्रेयसने फोनवरून बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होत नसल्याने तो संध्याकाळी घरी आला. घरात खॉटखाली बहिणीचे प्रेत पाहून त्याने आरडाओरडा केला. तोच राजेंद्र घरातील चाकू घेऊन आला. त्याने श्रेयसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दोघांच्यात झटापट झाली. या झटापटीत राजेंद्रला चाकू लागल्याने तो जखमी होऊन बेशुद्ध झाला. श्रेयसने या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहिका बोलवून राजेंद्रला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. अंजलीचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठविला. श्रेयसच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.