ट्रक, कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; धारबांदोडा येथे महामार्गावर अपघात : ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात
धारबांदोडा: ताथोडी-धारबांदोडा येथे फोंडा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर मर्सिडीज कारगाडी आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बंगळूर- कर्नाटक येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. काल शुक्रवारी दुपारी १.३० वा. सुमारास हा अपघात घडला.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केए-०३ एनटी ३०२१ या क्रमांकाची मर्सिडीज कार मोलेहून फोड्याच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या के ए २६ ए ४७२४ या मालवाहू ट्रकशी कारगाडीची समोरून जोरदार धडक बसली. त्यात कारमधील सुमन पॉल (५३) व त्यांच्या पत्नी सिंधू मारुती (४८) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सिंधू यांची बहीण सीमा सिके (५३) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक नागराज ममंद्री (कर्नाटक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. बंगळूरमधील हे कुटुंब गोव्यात एका लग्न समारंभासाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे. मयत सिंधु या बंगळूर येथील मर्सिडीज बेन्ज कंपनीत कामाला होत्या. कुळे पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक संदीप निंबाळकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
