For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जल्दी से आजा सांवरियाँ...

06:08 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जल्दी से आजा सांवरियाँ
Advertisement

कमल हासन (हसन नाही हासनच) ‘चाची 420’ मध्ये कमाल गाजला होता. त्याचा प्रेझेन्स, अभिनय आणि चित्रपटाची पटकथाही सुंदर होती. त्यातलं एक गाणं अजूनही फेमस आहे. प्रचंड घाईत आपला दिवस सुरू करणाऱ्या आणि सतत धावाधाव, धडपड करत घड्याळ गाठणाऱ्या प्रचंड बिझी स्त्राrच्या दिवसाचं अतिवेगवान वर्णन करणाऱ्या या गाण्याचे बोल आहेत,

Advertisement

दौडा दौडा भागा भागा सा

दौडा दौडा भागा भागा सा

Advertisement

वख्त ये सख्त है थोडा थोडा

थोडा थोडा माँगा माँगा सा

थोडा थोडा माँगा माँगा सा

खूँटियों पे टाँगा टाँगा सा

हरिहरन हे ग्रेट खरेच पण गुलजारजींची लेखणी आणि विशाल भारद्वाज यांचं कंपोजिशन या सगळ्याच गोष्टी धम्माल आहेत. कॅरमबोर्डवरून सटासट सोंगट्या सटकाव्यात तसे या गाण्याचे शब्द आणि सूर सटकत जातात अक्षरश:. वेग म्हणजे काय ते अनुभवायचं असेल तर हे गाणं सकाळच्या घाईच्या कामावेळी लावून ठेवावं. काम नेहमीच्या दुप्पट लयीत जाणारच. परिणामच तसा आहे त्याचा. आणि तसेही आपण आयुष्यभर धावतच असतो. घाई ही आपली खरीखुरी मैत्रीण असते. शहरात तर अतीच घाई असते.

सकाळी उठायची घाई, मग कामं आवरायची घाई, मग वेळेत पोहचायची घाई, मग परत ऑफिसची कामं उरकायची घाई, परत येण्याची घाई, त्यात बायकांना तर परत येताना असंख्य कामं उरकत उरकत येणं, मग उद्यासाठी तयारी करणं याची डबल घाई. आणि शेवटी पाच मिनिटे लवकर झोपण्याची घाई..कारण काय?

तर कारण असतो तो कमी वेळ आणि जास्त कामं. मग आपल्याला धरायला लागतो तो वेग आणि करायला लागते ती घाई. मग आपली घोडदौड सुरू होते आणि पाहता पाहता तिची कुतरओढ कशी होऊन जाते हे आपलं आपल्यालाच कळत नाही. परत त्या एवढ्या घाईत इतकी कामं असतात उरकायची. त्यातच चक्क घाईगडबडीत पहिल्या नजरेत प्रेमात पडणंही होऊन जातं. आणि मग तेवढ्या घाईत पुन्हा पुन्हा भेटी घेण्याचं ठरवलं जातं. जगाच्या घाईशी सहज जुळवून घेणारी बोल्ड ती त्याला विनवते. म्हणजे काय तर ऑर्डरच देते.

मुश्किल से थोडी सी बात होती है

रह जाती है

कितनी छोटी सी मुलाकात होती है

दो दिनों के बीच कितनी

लंबी लंबी लंबी लंबी

काली काली काली काली

रात होती है

जरा जल्दी जल्दी मिला करो ना जी

किती ती घाई! परत ती लतादीदींच्या मधाळ आवाजात असावी. शशिकपूरसारखा गोडमिट्ट हिरो असावा आणि हेमामालिनी नामक स्वप्नसुंदरी असावी. म्हणजे ही घाई ऐकून ऐकणाऱ्याची शुगरही तितक्याच वेगाने वाढायची! इतक्या घाईतली ही प्रेमाची घाई जास्तच गोड. काय करावं तरी? बरं ही घाई आणखी जरा पुढे सरकली की मग,

फोटोग्राफर जल्दी कर, जल्दी कर अब देर ना कर

देर ना कर मुझे जाना है घर

मैं कब से हूँ तय्यार दिल मेरा बेकरार

मुश्किल है इंतजार

समझे मिस्टर...?

असं म्हणावं लागतं तिला. ही भलतीच बोल्ड आहे. आणि गाणंही तितकंच रोमँटिक! त्या काळात तर जास्तीच...असरानी आणि रती अग्निहोत्रीवर चित्रित झालेलं आशाताईंनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं हे भलतंच वेगवान गीत आहे. ज्यांना काळाच्या पुढे जाण्याची नेहमी घाई असते अशांसाठी परफेक्ट.

एवढी घाई कशाला करतात कोण जाणे म्हणत म्हणत सगळेच घाई करत असतात. मुंबई किंवा अशा महानगरात तर समोर माणूस मरून पडला तरी बघायला वेळ नसणारी माणसं घाईघाईने पळत असतात. अशा शहराला शोभणारं एक जुनं गीत भगवान दादांचं आहे. द किशोर कुमार

गायक..

ए बाबू ये है जमाना तेरा ए बाबू

हे बाबू गा ले खुशी का राग

दुनिया है भागमभाग

हे गाणं प्रेक्षणीय आहे ते भगवान दादांमुळे आणि श्रवणीय का आहे हे सांगणे नलगे.. मग आपल्या लक्षात येतं की एवढ्या घाईगडबडीत मुंबैकर कसं काय सगळं जमवतात बुवा? तर त्याचं कारण हे आहे. त्यांना हा उपदेश किशोरदांनी फार पूर्वी करून ठेवला आहे.

याच घाईचा ठसकेबाज शृंगार बघायचा असेल तर मग थेट जगदीश खेबुडकरांच्या गीतांकडे जावं.

बिगी बिगी या बाई

बिगी बिगी या गं जाऊ चला

लचकत मुरडत ठुमकत ठुमकत

मथुरेच्या बाजारी जाऊ चला.

‘दोन बायका फजिती ऐका’ मधलं हे गाणं. लवकर लवकर बाजाराला जाण्याची घाई सगळ्याच गौळणींना असे. लवकर लवकर जाण्यापाठी लवकर एकदा त्या सावळ्याला भेटावं ही घाई राधिकेला. आणि एकदा का त्यांची भेट झाली की मग तिथून एकदाचं सुखासुखी निघता यावं, घरातल्या कुणालाही या सुखाच्या मधाच्या पोळ्याचा पत्ता लागू नये म्हणून बिचारीचा जीव वरखाली होत असे. घाईच्या गमतीची अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

गडी चली चम्बा ते चोवाडी चल वो गडिये

चल दी वैया वो वराडी चल वो गडिये

ही घाई कशाला तर

पीछे हिरोइण बिठाणी चल गडिये..एकूण भारीच..

मौसम है बहारों का, फूलों को खिलना है

चल जल्दी चल गडिये मेनु यार से मिलना है

हेही असं एक जुनं घाईगडबडीचं गाणं आहे. नवथर जोडप्याची कोवळी सूचक भाषा आणि जोडीला हे गाणं काय सुंदर वाटतं म्हणून सांगू? घाईच्या पाठी असणारं कारण जर इतकं मोहक असेल तर भई घाई लाज़मी आहे.

पण या जगातली सर्वात महत्त्वाची घाई काय असते माहिती आहे? आत्म्याने परमात्म्याला मिठी मारण्याची. म्हणून तर त्यावेळी

जरा जल्दी से आजा सांवरियाँ

तेरी भक्ती की ओढी चुनरियाँ

असं म्हणत समर्पित व्हायचं असतं. देवाच्या निस्सीम भक्तांनाही भले देवाशी शत्रुत्व करून का होईना पण लवकरच त्याच्या चरणाशी रुजू व्हायचं असतं. याच घाईपोटी हिरण्याक्ष नि हिरण्यकश्यपू होतात. घाई घाई करून भक्तांसाठी नृसिंह अवतार घडतो तो या घाईसाठीच..

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.