प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने हुपरीत महायज्ञ!
हुपरी वार्ताहर
यळगुड ( ता. हातकणंगले ) येथे पावित्रमय वातावरणात अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू श्री राम मूर्तीची प्राणप्रतिस्थापना आणि आनंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांच्या उपस्थितीत २०१ उभयंतानी हनुमान मंदिरात सकाळी साडे आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत भव्य स्वरूपात महायज्ञ करून श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान, अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेनंतर गावातील प्रत्येक भागात राममय वातावरणात गावातील हनुमान मंदिरात सर्व भाविक भक्त मोठया संख्येने रामनामाच्या नामस्मरणात दंग झाले होते.
अयोध्येमध्ये सोमवार २२ जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची १२. २९ मिनिटांनी प्राण प्रतिष्ठापना होणार असल्याने यळगुड गावात ठिक ठिकाणी घरावर प्रभू श्रीराम यांचे चित्र असलेले ध्वज लावण्यात आले. अनेक युवक डोक्यावर भगवी टोपी व गाडीला ध्वज लावून रामलल्लाच्या नावाने जय श्रीराम असे घोषणा देत फिरत होते.गावातील रामा मंदिरात सकाळी साडे सहा वाजता अभिषेक घालून अनेक भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर २०१ उभयंताची राम मंदिर ते हनुमान मंदिर पर्यंत वाद्यसह मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी चौक येथे २०१ जोड्यांचे विधीपूर्वक पाय पूजन करण्यात आले. तेथून हनुमान मंदिरात त्या जोड्यांना पायघड्या घालून नेण्यात आले. सर्व जोड्या एका रांगेत बसून सकाळी साडे आठ ते साडे अकरा वाजेपर्यंत महायज्ञ केले. सर्व भाविक भक्तांनी हनुमान मंदिर मध्ये पाऊण तास श्रीरामाचा जयघोष करीत रामनाम असे म्हणत जप केला त्यावेळी सर्वत्र वातावरण राममय झाले होते.
अयोध्यामध्ये श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भव्य स्वरुपाच्या मंडपात हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करून आठ ते नऊ हजार भाविक भक्तांना महाप्रसाद घालण्यात आला.