सावधान! वसंतगडावर वन्यजीवांचे जीव धोक्यात; रंगेहात पकडले जाण्यापूर्वीच शिकाऱ्यांचे पलायन
कराडजवळील वसंतगडावर वन्यजीव हत्येचा प्रकार उघड
कराड : ऐतिहासिक किल्ले वसंतगडावर सायाळाची शिकार केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. टीम वसंतगड दुर्गसेवकांची चाहूल लागताच मृत सायाळ तिथेच सोडून शिकारी पळून गेले. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या टिमने वसंतगड परिसरात शिकारींचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
याबाबत घटनास्थळ व वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीम वसंतगड दुर्गसेवकांच्या माध्यमातून गडाच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे दुर्गसेवक गडसंवर्धन व स्वच्छतेचे कामासाठी गडावर जात असताना त्यांना काही शिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. दुर्गसेवकांनी जवळ जावून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्गसेवकांची चाहूल लागताच शिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. यावेळी दुर्गसेवकांना
तिथे मृत सायाळ आढळून आले. दुर्गसेवकांनी तत्काळ याबाबतचीमाहिती वन परिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांना दिला. घटनेचे गांभिर्य ओळखून ललिता पाटील यांनी तातडीने वन विभागाची टिम वसंतगड येथे पाठवली. वन विभागाच्या टिमने घटनास्थळवरून मृत सायाळ ताब्यात घेतले असून वसंतगड परिसरात संशयीत आरोपींचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
वन विभागाची शोध मोहिम अद्याप सुरूच असून सायाळाची शिकार करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ललिता पाटील यांनी सांगितले.दरम्यान, किल्ले वसंतगह परिसरात वन्यजीव शिकारीची घटना पुन्हा समोर आल्याने पर्यावरणप्रेमी व दुग्प्रिमीमध्ये संतापाचे वातावरण आहे. किल्ले वसंतगड परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या शिकारीच्या घटना घडल्याचे प्रकाश साळुंखे, गौरव देवरुखकर, राज होवाळ व रामभाऊ माळी यांनी सांगितले. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाने गड परिसरात नियमित गस्त वाढवावी तसेच शिकारींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. वन्यजीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वन विभागासोबत नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ वन विभागाला द्यावी, असे आवाहन टीम वसंतगडच्या वतीने करण्यात आले आहे.