भावभक्तीचा भुकेला
सख्ख्यभक्तीमध्ये भगवंतांशी सलगी आपोआप निर्माण होते. संत नामदेवांचे पांडुरंगाशी बालपणापासून सख्ख्य आहे. म्हणून तर त्यांनी अर्पण केलेला नैवेद्य विठुरायांनी ग्रहण केला. संत मुक्ताबाईंनी नामदेव महाराजांना कच्चे मडके म्हटले तेव्हा अपमान वाटून ते पांडुरंगाला जाब विचारायला आले. पांडुरंगाने त्यांना गुरूंची वाट दाखवली.
एक दिवस भेटायला आलेले एक गृहस्थ म्हणाले, ‘एखाद्या दिवशी फार धावपळ झाली तर मी देवपूजा न करता देवाला टाटा करून ऑफिसला जातो. त्याला सांगतो, बाबा रे, संध्याकाळी भेटू-बोलू. तो काही माझ्यावर रुसत नाही, रागवत नाही. कारण तो माझा जीवलग सखा आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘ही माझी सख्ख्यभक्ती आहे.’ हे ऐकून गंमत वाटली. देव एक वेळ भक्ताची व्यस्तता समजून घेईल, वेळ मिळेल तेव्हा सवडीने उपासना करणाऱ्या भक्तांवर तो कृपा देखील करेल; परंतु न जाणो भक्तावर जर काही संकट आले तर हाच सख्ख्यभक्तीचा भाव कायम राहील का? नाही. अनुभव असा असतो की अपयश आले की देवाला दोष द्यायला माणसे तयार असतात. याला काही सख्ख्य म्हणता येणार नाही. व्यवहारातील सख्ख्य हे देवाशी जोडता येणार नाही.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘देवाच्या सख्ख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगांशी ताटातुटी । सर्व अर्पावे शेवटी । प्राण तोही वेचावा । आपुले अवघेची जावे। परी देवासी सौख्य राहावे?’ भगवंताशी सख्ख्य भक्ती करणाऱ्या सर्व संतांमध्ये ही निष्ठा दिसते. रामायणातील प्रेममूर्ती शबरीचे नाव काढले की तिची उष्टी बोरे आपल्या डोळ्यांसमोर येतात. श्रीरामांनी वनवासातील आपले सारे नियम बाजूला करून शबरीने दिलेली कंदमुळे भक्षण केली. तिच्याकडून चरण धुऊन घेतले. कारण शबरीचा भक्तीभाव प्रेमाने ओथंबलेला होता. तिची योग्यता खूप मोठी होती. अधिकार मोठा होता. तिने श्रीरामांना सीतेच्या शोधकार्यासाठी मार्ग सांगितला. सख्ख्यभक्तीचा पाया प्रेम आणि त्याग आहे.
सख्ख्यभक्तीमध्ये भगवंतांशी सलगी आपोआप निर्माण होते. संत नामदेवांचे पांडुरंगाशी बालपणापासून सख्ख्य आहे. म्हणून तर त्यांनी अर्पण केलेला नैवेद्य विठुरायांनी ग्रहण केला. संत मुक्ताबाईंनी नामदेव महाराजांना कच्चे मडके म्हटले तेव्हा अपमान वाटून ते पांडुरंगाला जाब विचारायला आले. पांडुरंगाने त्यांना गुरूंची वाट दाखवली. आपला मुलगा नाम्या प्रपंच धड करत नाही, दिवस-रात्र विठ्ठलनाम घेत बसतो, शिवण-टिपण करत नाही म्हणून संत नामदेवांची आई गोणाई विठोबाला वाटेल ते बोलते. विठोबा आपल्या भक्तासाठी ते मुकाट्याने ऐकून घेतो. एवढेच नाही तर गोणाई काहीबाही बोलेल म्हणून गुपचूप नामदेवांची कामेसुद्धा करतो. गोणाई तर विठोबाचे जेवणही काढते. हा विठुराया नामदेवाला सोडत नाही हे बघून ती चिडून उपहासाने म्हणते, ‘तुज नाही जाती कुळ । जेवुनी भ्रष्टविले बाळ?’ संत जनाबाई देखील विठोबाची तक्रार करताना म्हणतात, ‘वासुदेवा न कळे पार नाम्यासवे जेवी फार?’ भूक असो वा नसो हा विठुराया नामदेवांसोबत जेवत असतो. संत नामदेव सुद्धा देवाने भेटायला यावे म्हणून त्याला पेढ्याची लालूच दाखवतात. ‘येरे येरे देवा तुला देईन मी पेढा.’ जगाचे पोट भरणारा हा विश्वंभर त्याला भक्त आपल्या प्रेमाने खेचून आणतात. इतकेच नाही तर पंढरपूरसोडून मला कुठे पाठवू नकोस, हे संत नामदेव त्याला शपथ घालून सांगतात. ते म्हणतात, ‘खादल्या पिदल्याचे राखे बा स्मरण । तुला माझी आण पांडुरंगा ?’ लहानपणापासून मी जे तुला खाऊपिऊ घालत आलो आहे त्याची आठवण ठेव. मिठाला जाग.
संत जनाबाई तर विठोबाच्या लाडक्या भक्त. त्यांचे आणि विठोबाचे सख्ख्य काय वर्णावे? हा विठोबा भक्तांनी दाखवलेला पंचपक्वान्नाचा नैवेद्य सोडून जनीच्या घरी जातो आणि तिला खायला मागतो. संत जनाबाई म्हणतात, ‘कोणे एके दिवशी। विठू गेला जनीपाशी । हळूच मागतो खायासी । काय देऊ मी बा तुसी? । हाती धरुनी नेला आत । वाढी पंचामृत भात । प्रेमसुखाचा ढेकर दिला । जनी म्हणे विठो धाला ?’ जनाबाई आणि विठोबा यांचे सख्ख्य सांगताना जुन्या काळातील स्त्रिया ओवी गाताना म्हणतात,
‘रुक्मिनीच्या मंदिरी, आहेती चांदीचे गडवे पेले
जनाबाईच्या घरी, देव मोग्यानं पानी प्याले
रुक्मिनी जेवू वाढे, निरशा दुधामंदी केळं
पांडुरंगाला आवडलं, जनाबाईचं ताक शिळं’
संत चोखामेळा यांचा महिमा काय वर्णावा? गावकुसाबाहेर राहणाऱ्या चोखोबांकडे हा पांडुरंग द्वादशीच्या दिवशी पारणे सोडायला जातो. चोखोबाच्या कांतेकडे अतिथीचे रूप घेऊन दहिभात मागतो. ती म्हणते, आमच्या घरचे अन्न तुम्हाला दिले तर लोक आम्हाला मारहाण करतील. तेव्हा तो म्हणतो, ते आपण पुढे बघू. आधी मला खायला दे. सोयराबाईंनी वाटीभर दहीभात दिला. तो प्रसाद म्हणून त्याने तिला थोडा परत दिला. एकदा चोखोबाराय पांडुरंगाला दही पाजत होते हे एका माणसाने बघितले, तेव्हा जोखडात बैल जुंपण्यासाठी बसवतात त्या खुंट्यामध्ये चोखोबाला जुंपून त्याने आसूड मारले. हे बघून चोखोबांची पत्नी सोयराबाई यांना वाईट वाटले व रागही आला. त्या चिडून विठोबाला म्हणाल्या, ‘खाईले जेविले त्याचा हा उपकार? । दुबळीचा भ्रतार मारू पहासी? । अन्नाची त्वां क्रिया नाही रे राखली?’ तिचे हे बोल ऐकून चोखोबाराय म्हणाले, अगं मला काहीही झाले नाही. ‘अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी, त्याने चहू करी धरियेले.’ रखुमाईचा पती विठ्ठल हा असा भक्तांचा भुकेला आहे.
विठोबाला आवडतो दहीकाला. दहीभात, भाकरी, लोणचे सर्व एकत्र करून तो त्याचा काला करतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘दहीभात भाकरी, लोणचे परोपरी, आपण श्रीहरी, वाढीतसे । श्रीहरी वाढिले। गोपाळ जेविले । उच्छिष्ट सेविले । एका जनार्दनी?’ सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडून तो काला करतो आणि गोपाळांना भरवतो. गोपाळही त्याला घास भरवतात. काला भरवून झाला की हाताला लागलेली उष्टी शिते स्वत: चाटूनपुसून स्वच्छ करतो आणि ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही शिकवणही देतो. पंढरपूरच्या वारीची सांगता काल्याशिवाय होत नाही.
हा विठोबा भक्तीचा एवढा भुकेला आहे की पान, फूल, पाणी काहीही त्याला चालते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘मग निस्सीम भाव उल्हासे । मज अर्पावयाचेनि मिसे । फळ एक आवडे तैसे । भलतयाचे हो?’ निस्सीम भावाने भक्ताने एखादे फळ आणले तर ते देठ न तोडता मी खातो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, ‘अरे तू रोज मला गोड देतोच; शेवटी एखादे दिवशी जर कडू बदाम आला तर तो तुझ्या हाताने आला आहे, तो चांगलाच आहे, या भावनेने मी खातो असे भगवंत म्हणतो. तू फूल दिलंस तर त्याचा वास न घेता मी तोंडात टाकतो. फळाफुलांची गोष्ट सोडा. एखादे सुकलेले पानही मला चालते. कधीकधी फळ, फूल, पानही मिळत नाही; परंतु पाणी मिळेल की नाही? पाणी सुद्धा मला चालेल. भक्ताने प्रेमाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची विठोबाला किंमत आहे. संत तुकाराम महाराजांचे भोजन विठ्ठलाला फार आवडते. कोणते बरे ते भोजन? तर---
‘करू भजन भोजन । धणी घेऊ नारायण ।
तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्याने विठ्ठला?’
भजनाचे भोजन करून तृप्त होणारा विठोबा आणि सख्ख्यभक्तीचे सगुण साकार रूप असणारी ही संतमंडळी यांचे गुणगान करून आपले पोट भरले म्हणजे सार्थक झाले.
- स्नेहा शिनखेडे