हिवतड सबस्टेशनसाठी उद्यापासून उपोषण
आटपाडी :
आटपाडी तालुक्यातील हिवतड येथील वीज उपकेंद्र कार्यान्वित होण्यासाठीचे अडथळे तात्काळ दूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्यात येणार आहे. सोमवार २४ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांसह साखळी उपोषणास बसणार असल्याचे सांगत घाटनांद्रे येथे बंद पाडण्यात आलेले वीजेचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिवतड येथे महावितरणचे वीज उपकेंद्र उभारण्यात येत आहे. काम पुर्ण झाले असले तरी ते कार्यान्वित होण्यात अडथळे आहेत. घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथून वीजेचे पोल हिवतड सब स्टेशनला जोडायचे आहेत. फक्त घाटनांद्रे गावच्या हद्दीतील कामात व्यत्यय असून उर्वरीत काम पुर्ण झाले आहे. घाटनांद्रेतील प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तरी त्यातील अडथळे अद्यापही कायम आहेत.
हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी हिवतड येथील तरूण शेतकरी ऋषिकेश साळुंखे व सहकाऱ्यांनी केली आहे.
३३ केव्ही वीज उपपकेंद्राचे घाटनांद्रे येथील बंद पाडलेले काम त्वरीत सुरू करावे, ताडाचीवाडी (ता. खानापूर) येथील वनविभागाच्या हद्दीतील पोल उभारणीची परवानगी द्यावी, तळेवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील पोल उभारणीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन शेती संकटात आली आहे. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी वीज फक्त ४ तास मिळत आहे. शेती आणि शेतकरी संकटात असताना महावितरणचे हिवतड सबस्टेशन कार्यान्वित होण्याची नितांत गरज आहे. हे सबस्टेशन कार्यान्वित झाल्यास हिवतडसह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. सदर सबस्टेशन कार्यान्वित होण्यातील अडथळा कोणत्या कारणाने आहे, ते जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वीजेबाबत तात्काळ मार्ग काढावा, अशी मागणीही ऋषिकेश साळुंखे यांच्यासह गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
हिवतड सबस्टेशनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून शेतकरी बांधव साखळी उपोषण करणार आहेत. त्याची दखल प्रशासनाने घेवून तात्काळ घाटनांद्रे येथील अडसर दुर करून वीज कार्यान्वीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.