केंद्रे बुद्रुक व केंद्रे खुर्द ग्रामस्थ बसलेत प्राणांतिक उपोषणास
विस्थापित धरणग्रस्तांच्या खात्यात अनुदान जमा न झाल्याने उपोषण ; रक्कम जमा न झाल्यास जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा
दोडामार्ग - वार्ताहर
एकरकमी अनुदान मंजूर होऊन देखील ते अनुदान अद्याप दिले न गेल्याने केंद्रे बुद्रुक व केंद्रे खुर्द ग्रामस्थांनी सोमवारी मध्यरात्रीपासून येथील सातेरी मंदिरात प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे. आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मंजूर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे गुरुवारी पहाटे जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दै. तरुण भारत संवाद शी बोलताना दिला आहे.
तिलारी आंतरराज्य धरणामुळे आयनोडे, पाल, पाटये, शिरंगे, सरगवे, केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक ही गावे विस्थापित झाली. विस्थापित झालेल्यांना एकतर शासकीय नोकरी द्या, अथवा नोकरी ऐवजी एक रकमी अनुदान द्या, अशी मागणी तिलारी संघर्ष समितीने केली. त्या मागणीनुसार शासनाने धरणग्रस्तांना एक रकमी पाच लाख रुपये अनुदान दिले. मात्र या अनुदानापासून केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक गावातील १३ ग्रामस्थ वंचित राहिले आहेत. त्यांच्या खात्यात एक रकमी अनुदान जमा न झाल्याने २६ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून येथील सातेरी मंदिरात ग्रामस्थांनी प्राणांतिक उपोषणास केले होते. तिलारी आंतरराज्य प्रकल्पग्रस्तांपैकी अनुदान न मिळालेल्या २२ प्रकल्पग्रस्तांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमाणे एक कोटी दहा लाख रुपयाचे अनुदान देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने ३० नोव्हेंबर रोजी पारित केला होता. अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल याबाबतचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्याने तब्बल सहा दिवसानंतर शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले. तसेच मंजूर झालेले अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर जमा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. मात्र अद्याप पर्यंत या प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात एक रकमी अनुदान जमा न झाल्याने संतप्त झालेल्या सचिव संजय नाईक, कृष्णा जाधव, लवू गावडे, प्रकाश गावडे व ग्रामस्थांनी येथील सातेरी मंदिरात रविवारी मध्यरात्रीपासून प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे. तसेच हे अनुदान दोन दिवसात जमा न झाल्यास गुरूवारी जलसमाधी घेण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. त्याप्रमाणे गुरुवारी पहाटे जलसमाधी घेण्याचा निर्वाणीचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे.