बेळगाव आयएमएतर्फे उपोषण
कोलकाता येथील महिला डॉक्टर हत्याप्रकरणाचा निषेध
बेळगाव : देशातील डॉक्टरांची संघटना असणाऱ्या आयएमएने दिलेल्या देशव्यापी उपोषणाच्या हाकेला प्रतिसाद म्हणून बेळगाव आयएमएच्या शाखेने उपोषणात सहभाग घेतला. कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टराच्या बलात्कार व हत्याप्रकरणाचा निषेध म्हणून तसेच प. बंगाल सरकारने अद्याप डॉक्टरांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्याच्या निषेधार्थ आयएमएने देशभरात उपोषणाची हाक दिली होती. बेळगाव शाखेने या उपोषणाचा एक भाग म्हणून आयएमए सभागृहामध्ये मेणबत्या प्रज्वलित करून एक मिनिटाचे मैन धारण केले. या गंभीर घटनेबाबत असंवेदनशील सरकार व सरकारी यंत्रणेने पाळलेल्या मौनाचा निषेध म्हणून हा सांकेतिक निषेध करण्यात आला. कोलकाता घटनेचा निषेध म्हणून बेळगावमधील डॉक्टरांनी दंडाला काळ्याफिती बांधून व काळा पोषाख परिधान करून या घटनेचा निषेध केला. आयएमए सभागृहात बेळगाव शाखा अध्यक्ष डॉ. सचिन माहुली, सचिव डॉ. राघवेंद्र सागर यांनी बिम्समधील ज्युनियर डॉक्टरांशी संवाद साधून त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांच्या सुरक्षिततेबाबत बिम्स प्रशासनाशी चर्चा केली. या प्रसंगी डॉ. यलबुर्गी, डॉ. सावंत, डॉ. अम्मणगी, डॉ. लक्ष्मीकांत तुक्कार, डॉ. स्मिता कौजलगी उपस्थित होत्या.