'फॉरेक्स मार्केट’ मधून शेकडो गुंतवणूकदारांना गंडा
कोल्हापूर :
गुंतवणूकदारांना भिकेकंगाल करणाऱ्या ए.एस.ट्रेडर्सच्या म्होरक्याच्या कोल्हापूर पोलीसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी अद्याप अनेक मार्केटमधील घोटाळेबाज फरार आहेत. कळंबा येथील ‘सागर’ नावाच्या एजंटाने फॉरेक्स मार्केटच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदाना ‘साद’ घालून त्यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो राहत्या घरातून पसार झाला असल्यामुळे ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ सहन करणारे गुंतवणूकदार येत्या दोन दिवसांत पोलीसात रितसर तक्रार दाखल करणार आहेत.
जिल्ह्यात आजतागायत शेअर मार्केट, कमोडिटी मार्केटच्या घोटाळ्यामध्ये हजारो नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. अल्पकालावधीत जास्त परतावा मिळवण्याच्या अपेक्षेने गुंतवलेली लाखो रुपयांची मुद्दलच परत मिळाली नसल्यामुळे अनेकांच्या आयुष्याची कमाई ‘मार्केट’च्या घशात गेली आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विविध ‘मार्केट’ कंपन्यांचा आधार घेत लोकांना कोट्यावधीचा गंडा घातला आहे. यामध्ये ए.एस.ट्रेडर्स, मेकर ग्रुप, शुभ ट्रेडर्स, गोल्ड लाईफ अशा प्रकारच्या बारा कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चुना लावला आहे. आगामी काळात आणखी काही ट्रेडर्सचे घोटाळे बाहेर पडणार आहेत.
पैसे दुप्पट होण्याच्या अपेक्षेने लोक पैसे गुंवण्यासाठी पुढे येतात. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना लुटले जात आहे. यासाठी बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामधील काही कंपन्यांविरेंधात पोलिसांत तक्रार दाखल झाली असली तरी जनसामान्यांची फसवणूक पेलेल्या अनेक ट्रेडर्स कंपन्यांविरोधात लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये कळंबा-चंदगड कनेक्शन असलेल्या एका फॉरेक्स ट्रेडर्सच्या म्होरक्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी फसवणूक झालेले गुंतवणूदार एकत्र आले. त्यामुळे या विरोधात लवकरच स्थानिक गुन्हे अन्वेषक शाखेकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.
- गुंतवणूकदारांकडे धनादेश अन् नोटरी स्टँप
फॉरेक्स मार्केटचा म्होरक्या असलेल्या सागरने गुंतवणूकदारांना गुंतवलेली रक्कम परत देण्याबाबत नोटरी स्टँपवर लिहून दिले आहे. तसेच कोरे धनादेशही दिले आहेत. ही सर्व कागदपत्रे पोलीसात सादर करून गुंतवणूकदार पोलीसात तक्रार करणार आहेत.
- शिक्षक व व्यापाऱ्यांनी गुंतवले कोट्यावधी रूपये
जिह्यातील शेकडो शिक्षकांनी फॉरेक्स मार्केटमध्ये कोट्यावधी रूपये गुंतवले आहेत. आपल्या पगार तारणावर आणि अन्य शिक्षक मित्रांच्या नावावर लाखो रूपयांचे कर्ज काढून अनेक शिक्षकांनी कोट्यावधी रूपये गुंतवले आहेत. ठरल्याप्रमाणे परताव्याचे दोन, तीन हप्ते आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. पण पोलिसांत अथवा समाजात आपली फसवणूक झाली आहे हे सांगायचे कसे ? हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्यामुळे अनेक शिक्षकांनी गप्प राहणे पसंत केले आहे. त्वरीत दामदुपटीच्या हव्यासापोटी जिह्यातील काही व्यापाऱ्यांनीही फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे अडकले आहेत. यापैकी काही शिक्षक व व्यापारी लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत.
- फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करा
‘ए.एस.ट्रेडर्स’ प्रमाणेच जिह्यात आणखी काही शेअर, फॉरेक्स अथवा कमोडिटी मार्केट कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल, त्यांनी न घाबरता पोलीसात तक्रार दाखल करावी. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
महेंद्र पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक