शेकडो मच्छीमारी महिलांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
अंकोला तालुक्यात वाणिज्य बंदराच्या विरोधात महिला आंदोलक तीव्र
कारवार : अंकोला तालुक्यातील केणी येथील समुद्रकिनाऱ्यावरील नियोजित खासगी वाणिज्य बंदराच्या विरोधात शेकडो मच्छीमारी महिलांनी अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. कारवार जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या जमावबंदीचे (144 कलम) दाद न देता घेण्यात आलेल्या उग्र आंदोलनावेळी कडक उन्हामुळे तीन महिला अस्वस्थ झाल्या तर एक महिलेला समुद्रात कोसळली. अस्वस्थ महिलांना पहिल्यांदा अंकोला येथील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित वाणिज्य बंदर प्रकल्पास्थळी मोठ्या प्रमाणात किनारपट्टी सुरक्षितता दलाचे जवान आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मच्छीमारी महिलांनी छेडलेल्या तीव्र आंदोलनामुळे केणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, अंकोला तालुक्यातीला भावीकेरी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील केणी येथे खासगी वाणिज्य बंदर उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुमारे 4 हजार 119 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असलेले ग्रीन फील्ड नावाखाली हे बंदर उभारण्याचे कार्य जेएसडब्ल्यु या कंपनीला देण्यात आले आहे.
बंदर उभारण्याची चाहुल लागल्यापासून सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारी समाज विरोध करीत आहे आणि बंदर उभारण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करीत या बंदरामुळे केणी परिसरातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारी गरीब आणि मागासवर्गीय कुटुंब देशोधडीला लागणार आहेत, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. तथापि, सरकार प्रकल्प रद्द करण्याच्या मानस्थितीत नाही. दुसऱ्या बाजुला स्थानिक मच्छीमारी समाज जीव गेला तरी चालेल पण प्रकल्पा होवू देणार नाही, अशी भूमीका घेत आहेत.
जमावबंदी आदेश लागू करून सर्वेक्षण
सोमवारी सकाळी 6 ते मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत केणी परिसरात जमावंबीदचा आदेश लागू करून बंदर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जीओ टेक्नीकल इनवेस्टीगेशन वर्क सोमवारी हाती घेण्यात येणार होते. याची माहिती मिळताच हजारो मच्छीमारी बांधव समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. यामध्ये मच्छीमारी महिलांचा भरणा अधिक होता. संतप्त महिलांनी जिल्हा प्रशासनाच्या सरकारच्या आणि खासगी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या व कडक उन्हात समुद्रीकिनाऱ्यावर आंदोलन छेडले. यावेळी तीन महिला अस्वस्थ झाल्या.