For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपण कर्ते आहोत ह्या भ्रमात मनुष्य असतो

06:10 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आपण कर्ते आहोत ह्या भ्रमात मनुष्य असतो
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

कौरव पांडव हे एकाच कुळातील असल्याने आपल्यात युद्ध होऊ नये अशी पांडवांची इच्छा होती. म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला शिष्टाई करायला कौरवांच्याकडे पाठवले परंतु कौरवांनी त्याचे म्हणणे तर ऐकून घेतले नाहीच वर त्यांचा अपमान करून परत पाठवले. युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर कौरवांशी आपल्याला लढावे लागणार म्हणून सर्व तयारी करून पांडव सैन्यासह युद्धभूमीवर दाखल झाले. ह्या युद्धातील विशेष म्हणजे दोन्ही बाजूच्या सैन्यात एकमेकांचे नातेवाईक आपापसात लढायला उभे राहिले होते. अर्जुन हा अतिशय संवेदनशील होता त्याला परिस्थितीचा अंदाज यायला वेळ लागला नाही. दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, एकतर हे योद्धे युद्धात आपल्या हातून मरणार किंवा आपल्या बाजूने लढत असताना ते आपल्यासाठी मरण ओढवून घेणार, ह्या विचाराने तो कासावीस झाला. ह्या सर्वांच्या मृत्यूस कारणीभूत होण्यापेक्षा हे युद्ध न केलेलेच बरे असे त्याच्या मनाने घेतले आणि मी युद्ध करणार नाही असे त्याने ठामपणे श्रीकृष्णास सांगितले.

आता ह्याची समजूत काढली पाहिजे हे श्रीकृष्णाच्या लक्षात आले. ह्याला ह्याच्या खऱ्या ओळखीची जाणीव करून दिली पाहिजे असे त्याला वाटले. समजा एखादा नाटकात काम करत असेल तर तो करत असलेली भूमिका ही त्याची त्या नाटकापुरती ओळख असते. नाटक संपल्यावर तो पुन्हा त्याच्या मूळ ओळखीत परत येतो आणि तसे करताना त्याला बिलकुल कष्ट होत नाहीत कारण नाटकातील त्याच्या भूमिकेचे अस्तित्व तात्पुरते आहे हे तो पुरेपूर जाणून असतो.

Advertisement

नाटकाच्या बाबतीत ही बाब मनुष्य जितकी सहजी स्वीकारतो तितकी तो प्रत्यक्ष जीवनात स्वीकारायला तयार होत नाही. अर्जुनाचे तसेच झालेले होते. त्यामुळे आपली अर्जुन ही ओळख किंवा समोरच्या योद्ध्यांची आपले नातेवाईक ही ओळख विसरायला तो तयार नव्हता. भगवंतांनी त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यायचे ठरवले. दुसऱ्या अध्यायाच्या श्लोक अठरा ते तीस मध्ये हे सगळे समोर दिसणारे देह विनाशी असून फक्त आत्मा हा अविनाशी आहे ही बाब ते स्पष्ट करून सांगतात. देहाचा विनाश होणार म्हणून दु:ख करण्यापेक्षा कर्तव्यपालन करून आत्म्याला त्रिगुणांच्या कचाट्यातून सोडवून, आत्मस्वरुपात विलीन करण्यासाठी तू लढले पाहिजेस असा उपदेश ते अर्जुनाला करतात.

ते म्हणतात, हे सर्व विश्व आत्मस्वरूपाने व्यापलेले आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा नाश कुणीही करू शकत नाही. प्रत्येकाच्या देहात ह्या आत्म्याचा वास असतो. देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही. असं असलं तरी प्रत्येकाला आपल्या देहाबद्दल आत्मियता वाटत असते कारण प्रत्येकात असलेला आत्मा हा देहातील त्रिगुणांनी लिप्त झालेला असतो. त्यामुळे आपण कर्ते आहोत, ह्या भ्रमात तो असतो. प्रत्यक्षात आपली खरी ओळख आत्मा अशी आहे आणि आपण धारण केलेले देह हे आपले तात्पुरते अस्तित्व आहे.

ज्याप्रमाणे नाटकात काम करणारा नट भूमिकेशी कितीही समरस झालेला असला तरी मनातून आपली ओळख कधीही विसरत नाही किंवा स्त्राr पात्र साकारत असलेल्या पुरुषाला आपण स्त्राr आहोत असे कधी वाटत नाही, त्याप्रमाणे माणसाने जीवनाच्या रंगभूमीवर वावरताना आपण मुळचे आत्मस्वरूप आहोत हे कधीही विसरू नये. म्हणजे येथे आपली वर्तणूक योग्य होते आणि ही योग्य वर्तणूकच आपल्या आत्म्याला त्रिगुणांच्या कचाट्यातून सोडवून मुक्ती मिळवून देते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.