माणसे पिंजऱ्यात, जनावरे मोकाट
आपल्यापैकी बहुतेकांनी प्राणी संग्रहालय पाहिलेले आहे
कोणत्याही प्राणीसंग्रहालयात हिंस्त्र पशू किंवा जनावरे पिंजऱ्यांमध्ये ठेवलेली असतात आणि माणसे मोकळ्या वातावरणात फिरत त्यांना पाहतात. तथापि, एक प्राणीसंगहालय असे आहे, की जेथे अशी जनावरे मोकाट हिंडत असतात आणि त्यांना पहायला आलेल्या माणसांना मात्र प्रथम पिंजऱ्यात बंद केले जाते आणि ते पिंजरे फिरवून त्यांना प्राण्यांचे दर्शन घडविले जाते. असे हे विचित्र प्राणीसंग्रहालय चीनमधील चोंगकिंग या शहरात आहे. ते पाहण्यासाठी मोठी गर्दीही नेहमी होत असते. या प्राणीसंग्रहालयाचे नाव ‘लेहे लेदू’ असे असून ते जगातील अशा प्रकारचे एकमेव प्राणीसंग्रहालय आहे, असे बोलले जाते. त्यामुळेही ते चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
येथे आपण ‘अभयारण्य’ आणि प्राणीसंग्रहालय यातील वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे. आपण अभयारण्यात जातो तेव्हा तेथेही आपल्याला बंद गाडीत बसविले जाते आणि आणि आपण गाडीच्या काचेतून अरण्यात मुक्त संचार करणारे प्राणी पाहतो. अशी अभयारण्ये वनप्रदेशांमध्ये असतात. तथापि, प्राणीसंग्रहालये किंवा ‘झू’ शहरांमध्ये असतात. तेथे वनांमधून प्राणी पकडून आणून लोकांना पाहण्यासाठी बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे चीनमधील या एका प्राणीसंग्रहालयाचा अपवाद वगळता इतरत्र आपण मोकळेपणाने पिंजऱ्यात बंद असलेल्या प्राण्यांना पाहतो. पण या प्राणीसंग्रहालयात उलटा प्रकार आहे. हे संग्रहालय शहरातच, पण मोठ्या क्षेत्रफळात पसरले असून तेथे प्राण्यांना मोकळे ठेवण्यात आले आहे. हे प्राणी शहरात जाऊ नयेत म्हणून संग्रहालयाभोवती उंच आणि भक्कम भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीच्या बाहेरच्या भागांमध्ये पिंजऱ्यांसारख्या असणाऱ्या गाड्या आहेत. या गाड्यांमध्ये माणसांना बसविले जाते आणि गाड्या संग्रहालयात नेल्या जातात. या पिंजऱ्यांभोवती या संग्रहालयातील वाघ, सिंह, अस्वले, इत्यादी प्राणी जमा होतात आणि पिंजऱ्यांमधील माणसांना पाहतात. माणसांनाही मुक्त हिंडणाऱ्या प्राण्यांचे दर्शन भर शहरात होते. पिंजऱ्यांच्या गजांना मांसाचे मोठे तुकडे लटकविण्यात येतात. त्यामुळे ते खाण्यासाठी हिंस्त्र पशू पिंजऱ्यांच्या अगदी जवळ येतात आणि पिंजऱ्यांमधील माणसांना या प्राण्यांचे दर्शन जवळून घडले. हा अनुभव अद्भूत असतो, असे अनेक दर्शकांचे मत आहे.