इथे ओशाळली माणुसकी
कामगारांच्या पायाला साखळदंड बांधून वेठबिगारी : कित्तूरनजीक ढाबामालकाची क्रूरता
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरजवळ असलेल्या एका ढाब्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या पायात साखळदंड बांधून बंधनात ठेवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शुक्रवारी एका खासगी वाहिनीने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संबंधित ढाबा मालकाविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कित्तूरपासून जवळच असलेल्या तेगूर येथे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या न्यू मुल्ला ढाब्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. किचनमध्ये काम करणाऱ्या काही कामगारांच्या पायांत साखळदंड बांधण्यात आले आहेत. दिवसरात्र साखळी बांधूनच त्यांच्याकडून कामे करून घेण्यात येत होती, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
यासंबंधीची माहिती उजेडात येताच महसूल, पोलीस व कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेगूरजवळील ढाब्याकडे धाव घेतली. ज्या कामगारांच्या पायात साखळदंड बांधण्यात आले होते, त्या कामगारांची मुक्तता करण्यात आली. एका कामगाराच्या पायात साखळी बांधून त्याच्याकडून किचनमध्ये कामे करून घेताना गुप्त कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आणखी काही कामगारांच्या पायातही साखळी असल्याचे दिसून आले आहे.
ज्या कामगाराच्या पायात साखळी बांधण्यात आली होती, त्याचे वडीलही याच ढाब्यावर काम करतात. आपल्या मुलाची मन:स्थिती बरी नाही, त्यामुळे त्याच्या पायात साखळी बांधल्याचे त्यांनी सांगितले आहे. मन:स्थिती बरी नसेल तर या तरुणाला किचनमध्ये कामे कशी दिली? असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
एक-दोन लाख रुपये देऊन उत्तर भारतीय तरुणांना ढाब्यावर कामासाठी आणले जाते. ते पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या पायात साखळी बांधली जाते. खासगी वाहिनीने उघडकीस आणलेल्या या प्रकाराने बेळगाव जिल्ह्यात वेठबिगारीचे प्रकार अद्याप सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून मानवी हक्क आयोगाने त्वरित या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.