मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
सय्यद शेख, मस्तान खानच्या आवळल्या मुसक्या : मस्कत येथून आलेल्या तरुणीमुळे कारवाई
पणजी : विदेशात बेकायदेशीरपणे नोकरभरतीची एजन्सी चालवणाऱ्या आणि भारतातून मस्कतला तरुणींची तस्करी करणाऱ्या दोन संशयितांना गोवा पोलिस खात्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) काल सोमवारी अटक केली आहे, अशी माहिती सीआयडीचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली आहे. अटक केलेल्यांची नावे सय्यद अब्दुल्ला शेख आणि मस्तान खान अशी आहेत. एका तरुणीने मस्कतहून परतल्यानंतर सीआयडीशी संपर्क साधून तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
काल सोमवारी रायबंदर येथील सीआयडी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक राहूल गुप्ता यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सोबत उपअधीक्षक राजेश कुमार, निरीक्षक दत्तराम राऊत व अन्य अधिकारी उपस्थित होते. तरुणीने पोलिसांना माहिती दिली की, तिला मोलकरीण म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीरपणे मस्कतला पाठवले होते, जिथे तिचे लैंगिक शोषण केले गेले आणि उपासमारही केली.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सय्यद अब्दुल्ला शेख आणि मस्तान खान या दोघांना अटक केली. दोघेही बेकायदेशीरपणे विदेशात नोकरभरती एजन्सी चालवत होते. देशाच्या विविध भागातील आणखी अकरा तरुणी अशाच स्थितीत मस्कतमध्ये अडकलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर नोकरभरती एजन्सीने पाठवले होते. त्यांचे हाल होत असून त्यांचे लैंगिक शोषण होत आहे, असेही या तरुणीने पोलिसांना सांगितल्याचे अधीक्षक गुप्ता म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्या सूचनेनंतर गोवा पोलिसांनी परदेशातील नोकरभरती एजन्सींची सत्यता तपासण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा बेकायदेशीर एजन्सींवर कारवाई केली जाईल. जनतेने पुढे येऊन अशा दलालांविऊद्ध तक्रारी कराव्यात, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.