भारतीयांच्या मानव तस्करीला फ्रान्सला रोखले
दुबईतून आलेले विमान फ्रान्स पोलिसांकडून जप्त : 300 हून भारतीयांचा समावेश
वृत्तसंस्था/ पॅरिस
दुबईहून निकारागुआ येथे जात असलेल्या विमानाला फ्रान्स पोलिसांनी शुक्रवारी रोखले आहे. या विमानातून 300 हून अधिक भारतीय प्रवास करत होते. फ्रान्स पोलिसांनी मानव तस्करीच्या संशयामुळे हे विमान रोखले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून फ्रान्स पोलिसांनी वक्तव्य केले आहे. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना मदत करत असून भारतीय नागरिकांशी संपर्क साधला जात असल्याचे फ्रान्समधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.
एअरबस ए340 विमानाने दुबईहून गुरुवारी उड्डाण करत निकारागुआच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. या विमानात एकूण 300 भारतीय प्रवासी होते. इंधन भरण्यासाठी हे विमान फ्रान्समधील छोटे विमानतळ वॅट्री येथे उतरले होते. याचदरम्यान फ्रान्स पोलिसांना विमानातून प्रवास करणारे भारतीय हे मानवी तस्करीचे बळी ठरत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर फ्रान्स पोलिसांनी विमानतळावर धाव घेत विमानाला उड्डाण करण्यापासून रोखले आहे. मार्ने प्रीफेक्टच्या ऑफिसकडून जारी वक्तव्यात हे विमान रोमानियन चार्टर कंपनी लिजेंड एअरलाइन्सचे असल्याचे नमूद आहे.
प्रवाशांना पुरविल्या सुविधा
प्रारंभी विमानातच प्रवाशांना ठेवण्यात आले होते. नंतर सर्व प्रवाशांना वॅट्री विमानतळाच्या हॉलमध्ये रोखण्यात आले. तर पूर्ण विमानतळाला फ्रान्स पोलिसांनी घेरले आहे. या पूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गुन्हेविरोधी यंत्रणा जुनाल्कोला देण्यात आली आहे. या नागरिकांना आणखी किती दिवस ताब्यात ठेवले जाणार किंवा त्यांचे भारतात प्रत्यार्पण केले जाणार का यासंबंधी फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही.
भारतीय दूतावास सक्रीय
फ्रान्स पोलिसांनी भारतीय दूतावासालाही याप्रकरणाची माहिती दिली आहे. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी कल्पना दिल्यावर आम्ही आमच्या नागरिकांपर्यंत पोहोचलो आहोत. कॉन्स्युलर अॅक्सेस प्राप्त करण्यात आला आहे. या नागरिकांना पूर्ण मदत केली जात असल्याचे फ्रान्समधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
लिजेंड एअरलाइन्स कंपनीची मानव तस्करीत कुठल्याही प्रकारची भूमिका नाही. एका इसमाने हे विमान भाडेतत्वावर घेतले होते. प्रत्येक प्रवाशाची ओळख पटविणे आणि दस्तऐवजांची जबाबदारी त्याच इसमाची होती. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी प्रवाशांची माहिती एअरलाइन्सला दिली होती.
लिलियाना बकायोको, लिजेंड एअरलाइन्स निकारागुआ अन् मानव तस्करीचे कनेक्शन
निकारागुआ हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. निकारागुआच्या उत्तर दिशेला होंडुरास, पूर्वेला कॅरेबियन आणि दक्षिणेला कोस्टा रिका हे देश आहेत. पश्चिम दिशेला प्रशांत महासागर स्थित आहे. निकारागुआ हा देश अमेरिकेत अवैध प्रवेश करू पाहणाऱ्या लोकांसाठी नंदनवन मानला जातो. या देशाच्या मार्गे दरवर्षी हजारोंच्या संख्येत अवैध स्थलांतरित अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर पोहोचतात. या मार्गात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ज्यात भौगोलिक स्थिती आणि चोरी-दरोड्यासारख्या घटनाही सामील असतात. निकारागुआमध्ये या लोकांसंबंधी कुठलीही विशेष चौकशी केली जात नाही.