मानव तस्करी, वेठबिगारी समाजासाठी घातक
न्यायाधीश मुरलीमोहन रेड्डी यांचे प्रतिपादन
बेळगाव : चोरटी मानव तस्करी व वेठबिगार पद्धत समाजासाठी धोकादायक आहे. हे रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी ही पद्धत अद्यापही सुरू असून यासाठी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत. याबरोबरच नागरिकांनीही याला साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश व जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरलीमोहन रेड्डी यांनी केले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आयजीएम बेंगळूर, स्पंदन संस्था, बेळगाव आणि पोलीस खात्याच्या संयुक्त विद्यमाने मानव चोरटी तस्करी आणि वेठबिगार पद्धती निर्मूलनसंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन करून ते बोलत होते. ते म्हणाले, वेठबिगार पद्धत व मानव तस्करी समाजासाठी मारक असून हे रोखण्यासाठी पोलीस खाते, कामगार खाते यासह विविध सेवाभावी संस्था कार्य करत आहेत. ही पद्धत रोखणे केवळ या संस्थांचीच जबाबदारी नसून सर्वांनी संघटित प्रयत्न करून अशा मारक पद्धतीला रोखले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्पंदन संघटनेच्या कार्यकर्त्या व्ही. सुशिला म्हणाल्या, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार कामानिमित्त येत असतात. या दरम्यान त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत. त्यांच्या बरोबर येणाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे शोषण केले जाते. त्यांचे हक्क त्यांना मिळवून दिले पाहिजेत. देशाची प्रगती होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. कारखान्यांकडून काटामारी केली जाते. त्यामुळे ऊसतोड कामगारांना याचा फटका बसत आहे. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. महिलांना अहोरात्र काम करावे लागते. त्या ठिकाणी त्यांना मूलभूत सुविधा नसतात. त्यांच्या सोबत आलेल्या मुलांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले जाते. याची दखल घेऊन प्रशासनाने योग्य उपाययोजना राबविल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत अधिकारी बसवराज हेग्गनाईक, अॅड. बी. एल. पाटील, कामगार आयुक्त नागेश डी. जी. आदी उपस्थित होते.