For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्पमधील विहिरीत मानवी सांगाड्याचे अवशेष

10:59 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्पमधील विहिरीत मानवी सांगाड्याचे अवशेष
Advertisement

विहिरीची साफसफाई करताना सापडली कवटी-हाडे

Advertisement

बेळगाव : पाणी समस्येवर मात करण्यासाठी पडक्या विहिरीची साफसफाई करताना मानवी कवटी व हाडे आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. कोंडाप्पा स्ट्रीट, कॅम्प परिसरात हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅम्प परिसरातील पडक्या विहिरींतील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम कॅन्टोन्मेंटने हाती घेतले आहे. सोमवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12.30 यावेळेत केंडाप्पा स्ट्रीट येथील विहिरीतील गाळ काढताना मानवी कवटी व सांगाड्याचे काही भाग आढळून आले. तातडीने कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलिसांना ही माहिती दिली. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मानवी कवटी व सांगाड्याची हाडे जप्त केली आहेत. कॅन्टोन्मेंटमधील अधिकारी शिवप्रसाद महेश हरकुणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीसाठी कवटी व हाडे सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आली असून उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अवशेष विधिविज्ञान प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 25 वर्षांपासून ही विहीर वापरात नव्हती. त्यामुळे विहिरीत गाळ साचला होता. पाणी समस्येवर मात करण्यासाठी पडक्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी विहिरीत मानवी कवटी व सांगाड्यातील हाडे आढळली आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.