2500 वर्षे जुन्या विहिरीत मिळाले मानवी सांगाडे
इटलीत झालेल्या उत्खननादरम्यान सुमारे 2500 वर्षे जुनी एक रहस्यमय विहिर सापडली आहे. या विहिरीत एक पुरुष तसेच महिलेचा सांगाडा मिळाला आहे. याचबरोबर कांस्यच्या मूर्तीची तुटलेले हिस्से आणि एक अनोखी कांस्य प्लेट मिळाली आहे. ही काही साधारण विहिर नव्हती, तर याचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात होता असे पुरातत्वतज्ञांचे मानण आहे. विहिर एखाद्या प्राचीन शहराचा हिस्सा राहिली असावी, शहर वसविताना धार्मिक समारंभावेळी यात प्रथम कांस्य प्लेट आणि मूर्ती सोडण्यात आल्या, तर समारंभाच्या अखेरीस मृतदेह सोडण्यात आल्याची शक्यता आहे.
प्राचीन शहरानजीक विहिर
ही रहस्यमय विहिर आधुनिक इटलीच्या बोलोन्या शहराच्या बाहेरील भागात आढळून आली आहे. ख्रिस्तपूर्व 5 व्या शतकात या भागात एट्रस्कन लोकांनी काइनुआ नावाचे शहर वसविले होते. विहिर याच प्राचीन शहराच्या एका धार्मिक स्थळानजीक मिळाली आहे. या धार्मिक स्थळात यूनी नावाच्या देवीची पूजा व्हायची. यूनीला एट्रस्कन संस्कृतीची देवता मानले जाते आणि तिची तुलना प्राचीन रोमची देवी जूनोसोबत करण्यात येते.
चमकणाऱ्या कांस्य मूर्ती
विहिरीत दोन मूर्तींचे तुटलेले कांस्य हिस्से मिळाले आहेत, याचबरोबर एक अनोखी कांस्य प्लेटही मिळाली. प्या वस्तूंच्या मदतीने विहिर ख्रिस्तपूर्व 6 व्या किंवा 5 व्या शतकातील असल्याचे मानले जात आहे. हजारो वर्षे पाण्यात राहूनही कांस्यच्या वस्तूंची चमक आजही कायम आहे.
देवी यूनीशी संबंधित विहिर
यूनी देवीचा संबंध महिला, विवाह, जन्म आणि विकासाशी होता. विहिरीनजीक असलेल्या धार्मिक स्थळावरुन मिळालेले इतर पुरावे शहरात देवी यूनीची पूजा अत्यंत महत्त्वपूर्ण होती असे दर्शवून देतात. याचमुळे या विहिरीचा संबंध केवळ पाण्याशी नव्हता, येथे धार्मिक विधी केले जात असावेत असे संशोधकांना वाटत आहे.
मूर्ती का तोडण्यात आल्या?
विहिरीतून मिळालेल्या कांस्य मूर्तींमध्ये सुंदर कपडे परिधान केलेल्या महिला किंवा युवतींना दाखविण्यात आलेआहे. त्यांच्या कपड्यांवर बारीक सजावटही होती. या मूर्ती वरच्या सामाजिक वर्गातील महिला किंवा देवी दाखवित होत्या असे पुरातत्वतज्ञांचे मानणे आहे. युवा महिला या मूर्ती यूनी देवीला अर्पण करण्यासाठी धार्मिक स्थळावर घेऊन येत असण्याचीही शक्यता आहे. मूर्तींना जाणूनबुजून ताडले गेलेले असू शकते. प्राचीन धार्मिक विधींमध्ये कुठल्याही वस्तूला तोडून तिला देवतेला समर्पित करण्याची परंपरा असल्याचे पुरावे मिळतात.
कांस्यची प्लेटही अत्यंत खास
विहिरीतून मिळालेल्या कांस्य प्लेटने पुरातत्वतज्ञांना चकित केले ओ. आतापर्यत येथे मिळालेली ही अशाप्रकारची पहिली कांस्य प्लेट आहे. याचा आकार एट्रस्कन संस्कृतीच्या सामान्य मातीच्या भांड्यांप्रमाणे आहे. परंतु याच डिझाइनची कांस्य प्लेट यापूर्वी मिळाली नव्हती. त्याकाळात कांस्य अत्यंत मूल्यवान धातू होता आणि त्याला निर्माण करणे अत्यंत महाग अन् अवघड होते. एट्रस्कन लोक तांबे आणि टिनने कांस्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेला एकप्रकारे जिवंत अन् पुनर्जन्मयुक्त प्रक्रिया मानत होते. हाच विचार देवी यूनीशी निगडित जन्म आणि विकासाच्या प्रतिकवादाशी देखील जोडलेला असू शकतो.
मानवी सांगाडे का?
विहिरीत मिळालेली सर्वात रहस्यमय गोष्ट बहुधा एक पुरुष आणि एका महिलेचा सांगाडा आहे. या दोन्हींची उपस्थिती विहिरीच्या धार्मिक वापराशी संबंधित असू शकते असे संशोधकांचे मानणे आहे. कांस्य मूर्ती आणि प्लेट विहिरीत टाकणे त्याच्या उद्घाटन विधीचा हिस्सा असण्याची शक्यता आहे. तर मानवी मृतदेह विहिरीला बंद करण्याच्या दरम्यान समारोप विधीचा हिस्सा असू शकतो. तर या लोकांचा मानवी बळी देण्यात आल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नसल्याचे पुरातत्वतज्ञांनी स्पष्ट केले आहे.
संशोधनातून रहस्याची उकल
संशोधकांची टीम आता या सांगाड्यांची तपासणी करत आहे. डीएनए तपासणीतून हे लोक कोण होते आणि त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तर कार्बन-14 डेटिंगद्वारे त्यांचे वय आणि विहिरीच्या इतिहासाविषयी अधिक अचूक माहिती मिळू शकते.