For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानवी चूक की सिग्नल यंत्रणेचे अपयश ?

06:48 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मानवी चूक की सिग्नल यंत्रणेचे अपयश
.
Advertisement

कांचनजंगा एक्स्पे्रस अपघाताच्या कारणांची चर्चा : चौकशी त्वरित पूर्ण करण्याचा आदेश

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सोमवारी पश्चिम बंगालमधील दार्जिलींग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेसला सोमवारी झालेल्या भीषण अपघाताची चौकशी त्वरेने पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चौकशीनंतरच या अपघाताचे कारण समोर येणार असले तरी हा अपघात मानवी चुकीमुळे घडला की याला सिग्नल यंत्रणेतील बिघाड कारणीभूत आहे, यावर चर्चा होत आहे. हा अपघात थांबलेल्या प्रवासी गाडीवर मागून आलेली मालगाडी आदळल्याने झाला असे स्पष्ट करण्यात आले आहे. या अपघातात प्रवासी गाडीतील 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नंतर अपघातस्थळी जाऊन साहाय्यता कार्याची पाहणी केली होती.

Advertisement

प्राथमिक माहितीनुसार मालगाडीच्या चालकाने लाल सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला. तथापि, नव्या माहितीनुसार मालगाडीच्या चालकाची चूक नसल्याचे दिसून येत आहे. कांचनजंगा एक्स्प्रेस थांबलेल्या रुळांवर या एक्स्प्रेसच्या मागे मालगाडी थांबविण्याचा आदेश त्याला मिळाला होता. रानीपात्रा स्थानकाच्या प्रमुख अधिकाऱ्याने या चालकाला त्यासंबंधीचे ‘टीए-912’ हे अनुमतीपत्र दिले होते, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मालगाडीच्या चालकाने लाल सिग्नलकडे दुर्लक्ष करुन मालगाडी पुढे दामटली आणि त्यामुळे अपघात झाला, हे खरे नसल्याचे प्रतिपादन रेल्वेचालक संघटनेने केले आहे. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. ज्यावेळी स्थानकावरची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा काम करत नसते, त्यावेळी चालकांना ‘टीए-912’ हे अनुमतीपत्र दिले जाते, अशीही माहिती देण्यात आली आहे.

रेल्वेप्रशासनाचे म्हणणे

मालगाडी चालकाला अनुमतीपत्र देण्यात आले होते, हे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र, असे असले तरी या चालकाने अंतराचा नियम पाळला नाही, असे प्रतिपादन केले आहे. एकाच ट्रॅकवर दुसरी गाडी आणण्याची अनुमती देण्यात आली असली तरी दोन गाड्यांमध्ये किमान 150 मीटर अंतर राखणे आवश्यक असते. या नियमाचे पालन मालगाडी चालकाने केले नाही. त्यामुळे थांबलेल्या एक्स्प्रेसवर मागून मालगाडी आदळली, असे रेल्वेप्रशासनाचे म्हणणे आहे.

चालक संघटनेचा प्रतिवाद

तथापि, रेल्वेचालक संघटनेने प्रशासनाच्या या म्हणण्यालाही आक्षेप घेतला आहे. रानीपारा स्थानकावरची सिग्नल यंत्रणा व्यवस्थित काम करत नव्हती. त्यामुळे लाल सिग्नल मिळालेला असतानाही त्याला त्या सिग्नलच्या पुढे जाण्याची अनुमती देण्यात आली होती, असे चालक संघटनेचे म्हणणे आहे. टीए-912 या अनुमतीपत्राचा अर्थच असा आहे, की ट्रॅकवर दुसरी गाडी नाही. त्यामुळे चालकाला सिग्नलच्या पुढे जाता येते, असेही संघटनेचे प्रतिपादन आहे. संबंधित ट्रॅकवर पुढे दुसरी गाडी उभी आहे, याची स्थानकप्रमुखाला माहिती असूनही त्याने अनुमतीपत्र का दिले, हा प्रश्न असून त्याचे उत्तर चौकशीनंतरच मिळेल, असे दिसत आहे.

मालगाडी चालकाचा अपघातात मृत्यू

मागून आदळलेल्या मालगाडीच्या चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. कारण अनुमतीपत्र मिळाल्यामुळे संबंधित ट्रॅकवर दुसरी गाडी नाही, याची त्याला शाश्वती होती. त्यामुळे या सर्व प्रकरणात त्याची चूक नाही. त्याने स्वत:चा प्राण या अपघातात गमावला आहे. आता त्याच्यावर सर्व जबाबदारी ढकलून रेल्वे प्रशासनाला हात झटकता येणार नाहीत, अशी भूमिका चालक संघटनेने घेतली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या संदर्भात त्वरित चौकशी पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट केल्याने येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, सध्या चालक संघटना आणि रेल्वे प्रशासन यांच्यात अपघाताच्या कारणावरुन मतभेद झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Advertisement
Tags :

.