For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानवी हाडे अन् कवटी; काय होणार शेवटी?

11:47 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मानवी हाडे अन् कवटी  काय होणार शेवटी
Advertisement

शहरासह परिसरात आढळून आलेल्या मानवी अवयवांच्या तपासाचे आव्हान कायम : प्रत्येक प्रकरणाभोवती गूढ वलय

Advertisement

बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोंडाप्पा स्ट्रीट, कॅम्प येथील एका पडक्या विहिरीत आढळून आलेल्या मानवी कवटीचे गूढ अद्याप उकलले नाही. विहिरीतील गाळ काढताना आढळलेली कवटी व हाडे कोणाची आहेत? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे. कॅन्टोन्मेंटमधील अधिकारी शिवप्रसाद हरकुणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 8 एप्रिल रोजी विहिरीची साफसफाई करताना आढळलेली मानवी कवटी व हाडे कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. वैज्ञानिक पृथ्थकरणासाठी ती विधिविज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविली आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 15 दिवस उलटले तरी मानवी कवटी कोणाची आहे? महिलेची आहे की पुरुषाची? याचाही उकल झाला नाही. बेळगाव परिसरात आजवर असे अनेक प्रकार घडले आहेत. यापैकी एकाही घटनेत पोलीस यंत्रणा गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकली नाही. 30 जानेवारी 2022 रोजी कोंडुसकोपजवळील हनुमंत वारी परिसरात मानवी कवटी व हाडे सापडली होती. त्याच दिवशी हिरेबागेवाडी पोलिसांनी ती ताब्यात घेतली. भादंवि 302 व 201 अन्वये खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, या घटनेला दोन वर्षे उलटली तरी ती कवटी कोणाची? याचा उलगडा झाला नाही.

के. के. कोप्प आणि कोंडुसकोपच्या मध्ये हनुमंत वारीचा डोंगर आहे. मानवी कवटीपासून जवळच हाडे, जबडा व जीन्स पँटचा तुकडा आढळला होता. यासंबंधी पिराजी बेळगावकर यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. तब्बल पंधरा दिवसांनंतर हनुमंत वारीत आढळलेली कवटी सुमारे 35 ते 40 वर्षीय युवकाची असल्याचे विधिविज्ञान प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले. खून झालेला युवक कोण? त्याचा खून कोणी व कशासाठी केला? या प्रश्नांची उत्तरे दोन वर्षांनंतरही आढळून आली नाहीत. 1 ऑगस्ट 2021 ते 30 जानेवारी 2022 या वेळेत या अज्ञात युवकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, या प्रकरणाचा अद्याप उलगडा झाला नाही. कोंडाप्पा स्ट्रीट, कॅम्प परिसरातील ज्या विहिरीत मानवी कवटी आढळली, ती विहीर तब्बल 25 वर्षांपासून पडीक होती. पाणीसमस्येवर मात करण्यासाठी जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम कॅन्टोन्मेंटने हाती घेतले होते. विहिरीतील गाळ काढून साफसफाई करताना ही कवटी आढळली आहे. कवटी व हाडांव्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद वस्तू विहिरीत आढळली नाही. त्यामुळे एका निकषापर्यंत पोहोचणे तपास अधिकाऱ्यांना अवघड जात आहे.

Advertisement

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील उचवडे क्रॉसजवळ एक बोलेरो पिकअप् पेटवून दिल्याची घटना 4 डिसेंबर 2011 मध्ये उघडकीस आली होती. त्या वाहनामध्ये कोळसा झालेला एक मृतदेह आढळून आला होता. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तपासाची चक्रे फिरविण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे बेंगळूरपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. तोपर्यंत हे प्रकरण सरकारने सीआयडीकडे सोपविले. प्रकाश पडी (वय 28) रा. कटकोळ, ता. रामदुर्ग या तरुणाचा तो मृतदेह असल्याचे उघडकीस आले. याचवेळी श्रीनगर-धारवाड येथील रवींद्र पंडुरे (वय 30) या सायबर कॅफे चालकाच्या कुटुंबीयांनीही तो मृतदेह रवींद्रचा असल्याचा दावा केला. शेवटी पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी नमुने पाठविले. अहवालात तो मृतदेह प्रकाशचा असल्याचे उघडकीस आले. बेंगळूर येथील एका महिलेचा या प्रकरणात हात असल्याचा संशय होता. मात्र, तेथून पुढे या प्रकरणाचाही तपास सरकला नाही. दोन वर्षांपूर्वी कोंडुसकोपजवळील हनुमंत वारी येथे आढळलेली कवटी व पंधरा दिवसांपूर्वी कॅम्प येथील विहिरीत आढळलेल्या मानवी कवटी प्रकरणांचा छडा लागणार की काही दिवसांनी ही प्रकरणे विस्मरणात जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अहवाल आल्यानंतरच उलगडा होणार

विधिविज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मानवी कवटी महिलेची की पुरुषाची? याचा उलगडा होणार आहे. बेळगाव पोलिसांना त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यापूर्वीही बेळगाव शहर व उपनगरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यापैकी बहुतेक घटनांचा छडा लागला नाही. किल्ल्याजवळ काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या पिशवीत मानवी शरीराचे अवयव आढळले होते. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही त्याचे उर्वरित अवयव आढळले होते. दोन ठिकाणी आढळलेले मानवी अवयव महिलेचे असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होऊनही त्या महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे करणारा कोण? हे तर सोडाच, मृतदेह कोणाचा? याचा शोध घेणेही तपास यंत्रणेला शक्य झाले नाही. अशी अनेक प्रकरणे धूळखात पडून आहेत.

Advertisement
Tags :

.