‘बयान’मध्ये हुमा कुरैशी
चंद्रचूड सिंहसोबत झळकणार
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी आता निर्माता शिलादित्य बोरा यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. हुमा कुरैशी आणि चंद्रचूड सिंह हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाचे नाव ‘बयान’ असून हा एक तपासावर आधारित चित्रपट असणार आहे. विकास मिश्रा यांनी याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली असून याचे चित्रिकरण चालू महिन्यात राजस्थानात सुरू होणार आहे.
एक उत्तम पटकथा, गुणवंत कलाकारांचा संच आणि स्वत:च्या कामाबद्दल त्यांचे पूर्ण समर्पण या सर्व गेष्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आल्या असल्याचे हुमाने चित्रपटाची घोषणा करत म्हटले आहे.
राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट ‘बयान’ हा एका बापलेकीच्या कहाणीवर आधारित आहे. रुही नावाच्या युवतीभोवती याची कहाणी गुरफटलेली असून ती एक महिला हेर असते. तिला राजस्थानच्या एका छोट्या शहरातू पाठविण्यात आले असते, जेथे ती लीड म्हणून पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणाचा तपास करणार असते. यानंतर रुहीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्रपटात दाखविले जाणर आहे.
शिलादित्य बोरा, मधु शर्मा, कुणाल कुमार आणि अंशुमान सिंह यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कहाणी विकास यांनी लिहिली आहे. या चित्रपटात हुमा आणि चंद्रचूड यांच्यासोबत सचिन खेडेकर, अविजित दत्त, शम्पा मंडल, प्रीति शुक्ला, विभोर मयंक आणि अदिति कंचन हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.